गोंदिया : तालुक्यातील बिरसी कॅम्प येथील भारत बटालियन येथे मद्यप्राशन करून असभ्य वर्तन करणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांवर रावणवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. भारत बटालियनच्या अधिकारी विश्रामगृहात ते मद्यप्राशन करून लोळत होते. त्यांना कंपनी नायक व इतर अधिकाऱ्यांनी बेशुद्ध अवस्थेत गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणून त्यांची तपासणी केली असता ते मद्यप्राशन करून असल्याचे स्पष्ट झाले. ही घटना १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० वाजता घडली.
आरोपी पोलिस उपनिरीक्षक डी. पी. कोवासे व सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन के. नंदेश्वर या दोघांवर रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया तालुक्यातील बिरसी कॅम्प येथील भारत बटालियनच्या गट क्रमांक १५ येथे १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत दैनिक अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक डी. पी. कोवासे यांची ड्युटी लावण्यात आली होती. परंतु ते ड्युटीवर हजर न होता ते अधिकारी विश्रामगृहात दारू पिऊन आतून दार लावून बेशुद्ध पडले होते. तसेच भारत बटालियनच्या परिसरात मोर्चा सांभाळणाऱ्या ठिकाणी म्हणजेच पहारेकरी असलेल्या ठिकाणी पोलिस शिपाई नितीन के. नंदेश्वर हा देखील मद्यप्राशन करून ड्युटी करीत असल्याने त्याच्यावर देखील रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दोघांवर १० ऑक्टोबर रोजी रावणवाडी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार बर्वे करीत आहेत.
फोन न उचलल्याने झाला उलगडा
ड्युटी असल्याने पोलिस उपनिरीक्षक डी. पी. कोवासे यांना अर्धा तासापूर्वी फोन करण्यात आला. परंतु त्यांनी फोन उचलला नसल्याने पोलिस उपनिरीक्षक एन. एन. इंगळे, कंपनी नायक पोलिस निरीक्षक एच. आर. सिंह, सी. ओ. असई, एस. टी. बोपचे, आर. एच. बघेले व कंपनी कार्यालयीन कर्मचारी हे पाहण्यासाठी विश्रामगृहात गेले असताना ते मद्यप्राशन करून पडले होते.
इतरांसोबत केले असभ्य वर्तन
पाहणीसाठी गेेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आत दार बंद असल्याचे दिसल्याने दाराला धक्का देऊन दार उघडले. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक डी. पी. कोवासे यांनी अधिकाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केले.
मद्याच्या धुंदीत तो करीत होता पहारा
भारत बटालियनच्या मोर्चा येथे पहारा देण्यासाठी ९ ऑक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजता ते १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान पोलिस शिपाई नितीन के. नंदेश्वर यांची ड्युटी लावण्यात आली होती. परंतु मद्याच्या धुंदीतच ते ड्युटी करीत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष दिगंबरराव कळसकर यांना आढळले. ते ड्युटी चेक करण्यासाठी गेले असतांना तो मद्याच्या धुंदीत झिंगत असल्याचे आढळले. त्याला हॉल्ट न पुकारण्याबाबत विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचे संयुक्तिक उत्तर दिले नाही व असभ्य वर्तन करू लागला.