गोंदिया : शहर व परिसरात मोठ्या संख्येने मोरपिसांची विक्री करताना विक्रेते रस्तोरस्ती नजरेस पडत आहेत. भारतीय वन्यजीव कायदा १९७२ नुसार मोर हा राष्ट्रीय पक्षी अनुसूची-१ मध्ये समाविष्ट आहे. यामुळे वन्यजीव कायद्याने मोरपीस मिळविण्यासाठी मोराचा छळ करणे, हत्या करणे, त्याचे अवयव काढणे अथवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा ठरतो.
शिकारीचे पीस कसे ओळखाल?मोरपिसाचे अखेरच्या टोकाद्वारे निश्चितपणे वाइल्डलाइफ प्रयोगशाळेद्वारे हे सिद्ध केले जाऊ शकते की, पिसे उपटून काढण्यात आली आहेत की ती नैसर्गिकरीत्या गळालेली आहेत.
मोरपिसे कायद्यातून वगळलीवन्यजीव संरक्षण कायद्यात मोराला संरक्षण असले तरी त्याच्या पिसांच्या विक्रीबाबत कुठलीही शिक्षेची तरतूद नसल्याची माहिती आहे. मोरपिसे हा वन्यजीवाचा भाग नसल्याचे कायद्यात स्पष्ट असले तरी या पिसांकरिता मोरांना कुठलाही धोका मानवाकडून पोहोचविल्यास गुन्हा ठरतो.
काय आहे वन्यजीव संरक्षण कायदा?वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत वन्यजीवांना बंदिस्त करणे, त्यांचे अंग काढून जवळ बाळगणे, त्यांची हत्या करणे, छळ करणे, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांचा वापर करणे, हा गंभीर स्वरूपाचा अजामीनपात्र असा गुन्हा आहे. मोरदेखील वन्यजीव असून, कायद्याने त्यास संरक्षण प्राप्त आहे.
मोराची अंडी गोळा करणे गुन्हा■ मोराची अंडी गोळा करणे व कोंबड्यांद्वारे ती उबविण्याचा प्रकार करणे, हा वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो. मोराच्या अंड्यांना वन्यजीव कायद्याने संरक्षण आहे.■ कायद्यात ते वगळण्यात आलेले नाही. अंडी शोधून ती जंगलातून पळविण्याची कृती शिकारीच्या व्याख्येत येऊ शकते.
पावसाळ्यानंतर गळतात पिसेपावसाळ्यानंतर मोरांची पिसे नैसर्गिकरीत्या झडण्यास सुरुवात होते. विणीचा हंगाम हा जानेवारी ते ऑक्टोबर असा असतो. एकदा विणीचा हंगाम संपला की, मोरपिसे झडण्यास सुरुवात होते. विणीचा हंगाम जसा जवळ येतो, तसे मोराला पुन्हा नवीन पिसे आलेली दिसतात. असे वन्यजीव अभ्यासक सांगतात.
भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत मोराला अनुसूची-१ मध्ये संरक्षित केलेले आहे. मोराची हत्या, छळ किंवा बंदिस्त करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. मोरपिसे गळती हा नैसर्गिक भाग असल्यामुळे मोरपिसांना कायद्याने वगळले आहे, मात्र, मोरपिसे मिळविण्यासाठी मोराला कैदेत ठेवणे किंवा मारून टाकणे, हा मोठा गंभीर गुन्हा ठरतो. मोरपिसे विक्री करणाऱ्यांवर कायद्याने थेट कारवाई करता येत नाही, अशी माहिती आहे.