गोंदिया : जमिनीवरील नाव कमी करून देण्यासाठी लाचेची मागणी करून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आमगाव येथील तहसील कार्यालयात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. छाया वासुदेव रहांगडाले (४३, रा. बनगाव, आमगाव) असे लाचखोर कारकूनचे नाव आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार यांच्या जमिनीवरून त्यांना बहिणीचे नाव कमी करावयाचे होते व त्यासाठी त्यांनी संबंधित कागदपत्रांसह आमगाव येथील तहसील कार्यालयात २ मार्चला अर्ज दिला होता. मात्र, आतापर्यंत त्याबाबत नोटीस आली नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि.२२) ते रहांगडाले यांना भेटले व विचारणा केली. रहांगडाले यांनी काम करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर त्यांनी सोमवारी (दि.२५) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.
तक्रारीच्या आधारे पथकाने मंगळवारी (दि.२६) तहसील कार्यालयात सापळा लावला. त्यात रहांगडाले यांनी पंचासमक्ष तक्रारदाराला आठ हजार रुपयांची मागणी केली व तडजोडीअंती सहा हजार रुपये स्वीकारले. या प्रकरणात रहांगडाले यांच्यावर आमगाव पोलिसांत कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.