गोंदिया : फर्निचर दुकानाला आग लागून त्यातील लाखो रुपयांचे फर्निचर व अन्य साहित्य जळून भस्मसात झाले. शहरातील गौमतनगर परिसरातील संपदा फर्निचरमध्ये बुधवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजता दरम्यान ही घटना घडली.
शहरातील बाजपेयी वॉर्ड गौतमनगर परिसरातील रहिवासी गजानन कायरकर यांच्या संपदा फर्निचर या दुकानात आग लागल्याने माहितीवरून अग्निशमन दलाचे वाहन लगेच घटनास्थळी दाखल झाले. पथकाने लगेच आगीवर पाणी मारण्यास सुरुवात करून वेळीच आग नियंत्रणात आणली. मात्र तोवर दुकानातील फर्निचर, फोम, शूज मटेरियल, फर्निचर पॉलिश, केमिकल आदी जळून राख झाले. यामध्ये कायरकर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वृत्त लिहेपर्यंत नुकसानीचा आकडा तसेच आग लागण्याचे कारण कळू शकले नाही. मात्र दुकानाची स्थिती बघता लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून पडते.
या कारवाईत अग्निशमन अधिकारी निरज काळे, लिडिंग फायरमन लोकचंद भेंडारकर, छबिलाल पटले, वाहनचालक विकास बिजेवार, जितेंद्र गौर, नीलेश चव्हाण, जाकिर बेग, अजय सहारे, फायरमन मनीष रहांगडाले, नितेश रहांगडाले, लक्की पंडेले, विजय नागपुरे, सुनील मानकर, किशोर ठाकरे, मुकेश ठाकरे, सुमित बिसेन, सत्यम बिसेन, राहुल मेश्राम, ब्रिजेश बैरीसाल, तेजलाल पटले, अतुल जैतवार, विकास यादव, अजय रहांगडाले, मुकेश माने आदींनी भाग घेतला.
५ टँकर लागले आग नियंत्रणात आणायला
- फर्निचर दुकान असल्याने तेथे कापड, फोेम व लाकूड जास्त प्रमाणात असल्याने आगीने लवकर भडका घेतला. अशात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल ५ वाहनांचा वापर करावा लागला. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आल्याने काही सामान वाचविता आले. अन्यथा आणखी अनर्थ घडला असता.