गोंदिया - हत्तींच्या कळपाने मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी गावात प्रवेश करुन दोन नागरिकांच्या घरातील सामनाची आणि धानाच्या पोत्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. यामुळे जांभळी येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मागील तीन चार दिवसांपासून हत्तींच्या कळपाचा मुक्काम अर्जुनी मोरगाव व देवरी तालुक्यातील जांभळी, उमरपायली, पालांदूर, चिमणटोला या परिसरात आहे. हत्तींचा कळप रात्रीच्या सुमारास जंगलात परत जात असून पुन्हा सकाळी गाव परिसरात दाखल होत शेतातील धानपिकांचे नुकसान करीत आहे. मागील चार पाच दिवसांपासून हाच प्रकार सुरु असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मंगळवारी रात्रीच्या ८.३० वाजताच्या सुमारास हत्तींच्या कळपाने जांभळी गावात प्रवेश केला. जांभळी येथील अमृतराज कुंभरे सत्यशिला कुंभरे यांच्या घराच्या छप्परीत प्रवेश करुन तेथे ठेवलेल्या धानाच्या पोत्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. दरम्यान या दोन्ही कुटुंबातील लोकांनी आरडा ओरड केल्यानंतर शेजारी व गावकरी गोळा झाले. गावकऱ्यांनी आरडाओरड करुन टायर पेटवून हत्तींच्या कळपाला गावाबाहेर पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा कळप गंधारी गावाच्या दिशेने गेल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाचे पथक दाखलजांभळी गावात हत्तीच्या कळपाने प्रवेश केल्याची माहिती गावकऱ्यांनी गोठणगाव, जुणेवानी या वन परिक्षेत्रातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या परिसरातील गस्तीत सुध्दा वाढ केली असून गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहे.
गावकऱ्यांची उडाली झोप
मागील तीन चार दिवसांपासून हत्तींच्या कळपाने या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गावकऱ्यांची झोप उडाली आहे.