अर्जुनी मोरगाव : तब्बल सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीच्या कळपाची तालुक्यात एंट्री झाली आहे. सोमवारी या कळपाने भरनोली परिसरात शेतपिकांचे नुकसान केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा खैरी सुकळी, बाराभाटी परिसराकडे वळविला. या कळपाने शेतशिवारात बुधवारी रात्री धुमाकूळ घातला. यात नुकसान झाल्याची माहिती आहे. धुमाकूळाची मालिका सुरूच आहे. या कळपाने कवठा बोळदे मार्गे काळीमाती जंगलाकडे कूच केल्याची माहिती देऊन वन विभागाने नजीकच्या गावात दवंडी देऊन रहिवाशांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.
२० ते २२ च्या समूहात असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाची गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा मार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एंट्री झाली. राजोली, भरनोली, प्रतापगड, काळीमाती जंगल मार्गे खैरी, बाराभाटी परिसरात मंगळवारी रात्री दाखल झाले. ऐन धान मळणीच्या दिवसात कळप दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह वन विभागाला धडकी भरली आहे. नऊ डिसेंबरच्या रात्री राजोली, भरनोली येथील नीलकंठ हारामी यांच्या शेतात पाच एकरांतील धानाच्या पुजन्याची नासधुस करून हा हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला होता. १२ डिसेंबर रोजी पुन्हा या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात एंट्री केली. बाराभाटी येथे हत्तीच्या कळपाने पुरणलाल बेलखोडे, भोजराज बेलखोडे या शेतकऱ्यांचे पॅक हाउस व गांडूळ खत इमारतीची नासधूस केली. या इमारतीमध्ये ठेवलेल्या धानाच्या पोत्याचे नुकसान केले. तसेच, गौरव बेलखोडे यांच्या शेतात असलेल्या पोल्ट्री फार्मची नासधुस केली. आवारभिंतीची जाडी, सिमेंटचे खांब, केळी व नारळाची झाडे सुद्धा उद्ध्वस्त केली. हेमराज बेलखोडे, किशोर बेलखोडे, महेश बेलखोडे, भागवत बेलखोडे यांच्याही धानाच्या पोत्यांची नासधुस करून शेतातील पोपट, हळद, मिरची, तूर व उन्हाळी रोपांचे नुकसान केले आहे.
राजकुमार बडोले यांनी केली नुकसानीची पाहणीमाजी मंत्री राजकुमार बडोले, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, नवेगावबांधचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.जी. अवगान यांनी घटनास्थळी भेट दिली. क्षेत्र सहायक व्ही.एम. करंजेकर, एल.व्ही. बोरकर, व्ही.एल. सोयाम, एस.टी. राणे यांनी नुकसानग्रस्त परिसरांची पाहणी केली व पंचनामे तयार केले. शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरणसध्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतशिवारात धान कापणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी सकाळपासून शेतावर असतात. मात्र, हत्तींच्या कळपाने या परिसरात धुमाकूळ घालून धानाच्या पुंजण्याचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वन विभागाची चमू हत्तींच्या मागावरगडचिरोली जिल्ह्यात परत गेलेला हत्तींचा कळप पुन्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यात मंगळवारी (दि.१२) रात्री अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल झाला. या कळपाने खैरी सुकळी, बाराभाटी परिसरातील शेतशिवार धुमाकूळ घालून धान पिकाचे नुकसान केले. त्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, हत्तींच्या हालचालींवर वन विभागाची चमू नजर ठेवून आहे.