गोंदिया : धानाचे शेत प्रिय असलेल्या सारसाच्या जोडीचा करंट लागून मृत्यू झाला. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता गोंदिया तालुक्याच्या कामठा येथील आश्रमशाळेच्या मागील भागात असलेल्या नंदागवळी यांच्या शेतात घडली.
नंदागवळी यांच्या कामठा येथील शेतातील विद्युत वाहिन्यांना सारस अडकल्याने करंट लागून त्यांचा मृत्यू झाला. ३३ केव्ही लाईनचा करंट या सारस जोडीला लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. नंदागवळी यांनी गावातील एकाला बटई धानाची शेती दिली आहे. ते धान कापण्यासाठी सकाळीच शेतकरी शेतात गेले असतांना त्या सारस जोडीचे मृतदेह दिसले. त्यांनी वेळीच याची माहिती गावात दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक राजेनद्र सदगीर, वनपरिक्षेत्राधिकारी भालेकर, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, सावन बहेकार, वनरक्षक प्रवीण कडू दाखल होऊन त्यांनी सारसाला ताब्यात घेतले. पशूवैद्यकीय अधिकारी आडे यांनी पंचनामा केल्यानंतर त्या सारसाच्या जोडीला मुखाग्नी देण्यात आला. मृत पावलेली सारसाची जोडी ५ ते ६ वर्ष वयोगटातील आहेत. एक पुरूष तर दुसरा मादा जातीचा सारस आहे. गोंदियाच्या परसवाडा, झिलमिली तालावावर विदेशी पक्षी व सारस असतात. गोंदिया जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या सारस गणनेत ३६ सारस होते. आता दोन सारसांचा मृत्यू झाल्याने ३४ सारस उरले आहेत.