अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : तालुक्यातील अरततोंडी ते पिंपळगाव खांबी दरम्यानच्या नाल्यावरील पुलावरून मंगळवारी सकाळी एक अनोळखी व्यक्ती सायकलसह वाहून गेल्याची घटना घडली. सोमवारी सायंकाळपासून तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. अद्याप शोधमोहीम सुरू आहे. त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रशासनातर्फे आजूबाजूच्या गावात दवंडी देण्यात आली आहे.
सोमवारपासून तालुक्यात दमदार पर्जन्यवृष्टी होत आहे. गेल्या २४ तासात सुमारे १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने नाले भरून वाहत आहेत. पिंपळगाव/खांबीच्या नाल्यावरून सोमवारी रात्रीपासून पाणी वाहून जात आहे. मंगळवारी सकाळी हा व्यक्ती सायकल घेऊन नाल्यातून रस्ता पार करत होता. प्रवाह अधिक असल्याने तो नाल्यात वाहून गेला.
विदर्भात सर्वव्यापी पाऊस; भंडारा, गाोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात रात्री धुवांधार
काही प्रत्यक्षदर्शींनी याचे व्हिडीओ सोशल मीडियावर घातले आहेत. तलाठी सुरेश हरिणखेडे यांनी या दुर्घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना दिली. तहसीलदारांनी घटनास्थळी भेट दिली. हरिणखेडे ग्रामस्थांसोबत शोधमोहीम करीत आहेत.