गोंदिया : तक्रारदाराच्या मुलाला अटक न करता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी १४ हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना सालेकसा पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हवालदार २३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. विजय सावजी हुमणे असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलाचा घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत पाण्यावरून १८ मार्च रोजी वाद झाला होता. शेजाऱ्यांनी तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध सालेकसा पोलीस स्टेशन येथे ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास हवालदार विजय हुमणे करीत होते. हुमणे यांनी तक्रारदाराला १९ मार्च रोजी सालेकसा पोलीस स्टेशन येथे बोलावले होते. तेव्हा हुमणे यांनी तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्याला अटक न करता परस्पर न्यायालयात हजर करण्यासाठी व तपासात सहकार्य करण्यासाठी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार गोंदियालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून तडजोडीअंती १४ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सालेकसा येथील बाजार चौकातील चहाच्या दुकानात पोलीस हवालदार विजय हुमणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी आरोपी विजय हुमणेविरुद्ध सालेकसा पोलीस स्टेशन येथे कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेकर, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, राजेंद्र शेंद्रे, मंगेश कहालकर, अशोक कापसे, संतोष शेंडे, संतोष बोपचे यांनी केली.