आमगाव (गोंदिया) : गावाला जाण्यासाठी येथील बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत असलेल्या गर्भवती महिलेला प्रसवकळा सुरू झाल्या. तिला या कळा सहन न झाल्याने ती वेदनेने विव्हळत होती. दरम्यान, ही बाब या परिसरातून जाणाऱ्या तीन युवकांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच १०८ रुग्णवाहिकेला बोलावून या महिलेला बनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर या महिलेने प्राथमिक आरोग्य केंद्रात एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास घडली.
कोकिळा राजेंद्र दमाहे (वय २४, रा. नवेगाव, ता. सालेकसा, जि. गोंदिया) असे त्या महिलेचे नाव आहे. ती हैदराबाद येथे पतीसह रोजंदारीचे काम करते. शुक्रवारी ती हैदराबादवरून तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेसह बाळंतपणासाठी गावाला जाण्यासाठी हैदराबादहून परत आली होती. यानंतर त्या दोघीही नवेगाव येथे जाण्यासाठी आमगाव येथील शिवाजी चौकात बसची वाट पाहत होत्या. दरम्यान, आमगाव येथील बसस्थानकावरच कोकिळाला प्रसववेदना सुरू झाल्या. तिच्यासोबत असलेल्या महिलेने ऑटोचालकाला थांबवून रुग्णालयात सोडून देण्याची विनंती केली; पण ऑटोचालकाने चारशे रुपये लागतील असे सांगून तो पुढे निघून गेला. तर कोकिळाला प्रसववेदना सहन होत नव्हत्या.
दरम्यान, या मार्गावरून जात असलेले आमगाव येथील लोकेश बोहरे, बालू येटरे, राजीव फुंडे या युवकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी लगेच या महिलेच्या मदतीला धावून जात १०८ रुग्णवाहिका बोलावून तिला बनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर कोकिळाने प्राथमिक आरोग्य केंद्रात एका गोंडस बाळाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असून वेळीच हे तीन युवक देवदूतासारखे धावून आल्याने कोकिळाने त्यांचे आभार मानले. डॉ. शीतल नागरीकर, वाहनचालक मनोज रहांगडाले, आरोग्यसेविका ज्योती सोनवाने, आरोग्यसेवक टी. डी. मुनेश्वर, सी. एच. सोनकनवरे यांनी सहकार्य केले.
पती, कुटुंबीयांना दिली गोड बातमी
कोकिळा ही नऊ महिन्यांची गर्भवती असल्याने ती बाळंतपणासाठी शेजारील महिलेला सोबत घेऊन गावी जात होती. कोकिळाचा पती राजेंद्र हा हैदराबाद येथे आहे. दरम्यान, गावाला जात असतानाच कोकिळाने गोंडस बाळाला जन्म दिला. याची बातमी तिच्यासोबत असलेल्या महिलेने कोकिळाचा पती व त्यांच्या कुटुंबीयांना दिली.