सालेकसा: तालुक्यातील भजेपार-बोदलबोडी दरम्यान वाघ नदीवर मोठे पुल मंजूर असून दोन वर्षापासून बांधकाम रखडलेले असल्याने संतप्त नागरिकांनी चक्क वाघ नदीच्या पात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन करून शासन प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
सविस्तर असे की, मागील 60 ते 70 वर्षापासून पुलाची मागणी होती. अखेर पुल मंजूर झाला, दोन वेळा या पुलाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. त्या नंतर पुलासाठी खोदकाम करत असताना दगड लागल्याचे कारण देत दोन वर्षापूर्वी खोदकाम अर्धवट ठेवल्याने आधीचा रस्ता बंद पडला. परिणामी नागरीकांना १ किमी अंतरावर जाण्यासाठी १५ कीमी फेऱ्याने पायपीट करावी लागत असल्याने प्रचंड आक्रोश खदखदत आहे. अनेकदा निवेदने देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत असल्याने त्याला झोपेतून जागवण्यासाठी 20 फेब्रुवारीला अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भजेपार, बोदलबोडीसह परिसरातील अनेक गावातील नागरिक सहभागी झाले.
भजेपार येथील सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार आणि बोदलबोडी येथील सरपंच देवेंद्र पटले तथा दोन्ही गावचे प्रमुख पदाधिकारी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान सरपंच संघटनेचे गौरीशंकर बिसेन, प्रिया शरणागत, तमील कुमार टेंभरे, नरेश कावरे यांनी आंदोलनात सहभागी होऊन सरपंच संघटनेचा पाठिंबा घोषित करत तेही नदी पात्रात उतरले. आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली असता दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उसेंडी, उप अभियंता मानकर यांनी आंदोलन स्थळी पोहचून लगेच 24 फेब्रुवारी पूर्वी काम सुरू होईल असे लिखित आश्वासन दिले. दरम्यान कामासाठी मशीन देखील पोहचवली. त्यानंतर नदी पात्रात आंदोलन करत असलेले नागरिक बाहेर आले. राष्ट्र वंदना करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलन यशस्वी झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.