लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : परिसरातील ग्राम रेंगेपार येथील वनविभागाच्या जंगलातून सागवान तोडून वनविभागाचे अधिकारी सागवन भरलेला ट्रॅक्टर नेत असताना गावकऱ्यांनी थांबविले. गुरुवारी (दि.१७) रात्री १ वाजतादरम्यान गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पकडला असून अवैध सागवान नेले जात असल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे. शुक्रवारी (दि.१८) गावकऱ्यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी व वनपाल यांना बोलावून पंचनामा करविला. सागवान वनविभागातील असून त्याचे प्रकरण तयार आले नव्हते. त्याचप्रकारे वनविभागातील वनरक्षक व ठेकेदारांनी संगनमत करून सागवन तोडल्याचे गावकरी बोलत आहेत. कोसमतोंडी कार्यालय अंतर्गत मालीजुंगा, रेंगेपार, गोंगले, मुरपार, लेडेंझरी, वनविभागाच्या जंगलातून अवैध लाकूड तोड वनरक्षकाचा संगनमताने केली जात असून वनविभागाने अजून प्रपत्र कार्यवाही न केल्याचे सुध्दा रेगेपारवासी बोलत आहेत. सध्या सरकारने जीएसटी लावली आहे. परंतु या परिसरातील ठेकेदार जीएसटी दुसऱ्या नावाने तयार करून लाकूड विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाबसुध्दा उघडकीस आली आहे. अशाच प्रकारचा सागवान तोडून विक्रीला नेला जात असावा अशाप्रकारे संशय गावकऱ्यांना आला. यातूनच गुरुवारी रात्री १ वाजता सागवन भरलेला ट्रॉली क्रमांक एमएच३५-एफ ४२३८ व इंजिन क्रमांक एमएच ३५-एएफ ५०९१ गावकऱ्यांनी पकडला. शुक्रवारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी व सहवनपाल कोसमतोंडी येथील सर्व अधिकाऱ्यांना बोलावून ट्रॅक्टरमधील सागवन जप्त करण्यात आले. त्यामुळे रेंगेपार येथे मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. वनरक्षक मंदा बिसेन यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहेत.
सागवन जप्त करून डोंगरगाव डेपोला जमा केले जाईल. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. -सुनील मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक-अर्जुनी रेगेपार येथे अवैध सागवन तोडल्या गेल्याची माहिती मिळाली, त्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांसोबत येऊन १७ मार्च रोजी रात्री सागवन गावातील ट्रॅक्टर बोलावून कोसमतोंडी येथे जप्त करण्यासाठी नेत असताना गावकऱ्यांनी थांबविले. -मंदा बिसेन वनरक्षक रेंगेपार