तिरोडा (गोंदिया) : नागपूर येथे जात असलेल्या विवाहित महिलेचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना हावडा-मुंबई मार्गावरील तिरोडा रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि.१२) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. स्वर्णा आशिष जैन (२६) असे रेल्वेने कटून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार स्वर्णा जैन या जबलपूर येथील रहिवासी असून रिवा येथील त्यांचे माहेर आहे. तिचे पती काचेवानी रेल्वे स्टेशनवर हेल्पर म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी स्वर्णा जैन या आपल्या चार वर्षीय मुलाला घेवून नागपूर जाण्यासाठी तिरोडा रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. दरम्यान तिरोडा रेल्वे स्थानकाच्या फलाटावरुन उतरुन त्या रेल्वे लाईन क्रास करीत असताना हावडाकडून येणाऱ्या गितांजली एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी तिरोडा रेल्वे पोलिसांनी नोंद केली आहे.