गोंदिया : तिरोडा जवळील अदानी वीज प्रकल्पात कार्यरत कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २७) सायंकाळी घडली. अशोक जीवन हरिणखेडे (४६, रा. चिखली) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेने प्रकल्प व मृताच्या गावात वातावरण चांगलेच तापले असून गावात तणावसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अदानी वीज प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कामगारांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी अशोक हरिणखेडे हे सामान्य पाळीत वीज प्रकल्पात कामावर होते. भोजन करण्याच्या कालावधीत त्यांनी जेवण घेतले. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांच्या सहकारी कामगारांनी वीज प्रकल्पात कार्यरत डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून अशोक हरिणखेडे यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच प्रकल्पात कार्यरत कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. कोणताही अनुचित प्रकार उद्भवू नये म्हणून प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
शुक्रवारी (दि. २८) जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र, मृतदेह गावात पोहोचताच जोपर्यंत मृताच्या कुटुंबाला अदानी वीज व्यवस्थापन २० लाखांची आर्थिक मदत देत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतल्याने गावात तणाव निर्माण झाला. अदानी वीज प्रकल्पाचे कोणतेही जबाबदार अधिकारी चिखली गावात पोहोचले नव्हते. घटनेचे गांभीर्य पाहून गावातही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुलींचे पितृछत्र हरपले
अशोक हरिणखेडे हे कुटुंबात एकमेव कमावते व्यक्ती होते. ते अदानी वीज प्रकल्पाच्या अक्वा कंपनीत गत ८ वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी अपर्णा (४३), मुलगी रूपाली (१५) व त्रिवेणी (१३) असा परिवार आहे. रूपाली व त्रिवेणीचे पितृछत्र हरविल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.