गोंदिया: कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने आली. या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. या संकटाच्या काळात कुणी घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तळहातावर कमवून खाणाऱ्या तसेच विधवा, परित्यक्ता, वृद्ध, अपंग अशांना मदत म्हणून ज्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो, त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्याचे ठरविण्यात आले. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील १ लाख २० हजार लोकांना मुख्यमंत्र्यांची ही मदत मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे २४ हजार ३० लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना ( अनुसूचित जाती) ४ हजार ५६३, संजय गांधी निराधार अनुदान योजना ( अनुसूचित जमाती) ३ हजार २५७ लाभार्थी, श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तीवेतन योजना ४९ हजार १०४, श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तीवेतन योजना (अनुसूचित जाती) ४ हजार ३२८, श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तीवेतन योजना (अनुसूचित जमाती) ३ हजार ६९३, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृती वेतन योजना २६ हजार ६१२, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृती वेतन योजना ३ हजार ८३१, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृती वेतन योजना ३२७, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ९८ जणांना लाभ देण्यात येत आहे.
......................................
योजनानिहाय लाभार्थी संख्या
संजय गांधी निराधार योजना-३१८५०
श्रावणबाळ योजना-५७१२५
इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना-२६६१२
इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना - ३८३१
इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना - ३२७
........
कोरोनाच्या लाटेमुळे संचारबंदी असल्याने आपल्याला बँकेत जाताच येत नाही. शासनाने पैसे दिल्याची वार्ता कानावर आहे; परंतु पैसे खात्यात आले किंवा नाही, याची माहिती नाही.
-मीराबाई हुकरे, लाभार्थी, पदमपूर.
..........
शासनाकडून दर महिन्याचे एक हजार रुपये मदत मिळतात; परंतु कोरोनामुळे सरकारने एक हजार रुपये अधिकचे खात्यात जमा करण्याचे सांगितले; परंतु आम्ही कोरोनाच्या भीतीमुळे पैसे आले किंवा नाही, ते पहायला बँकेत गेलो नाही.
बळवंतराव मेंढे, लाभार्थी खातिया.
........
पैसे आले किंवा नाही, माहीत नाही. संचारबंदी करण्याच्या अगोदर खात्यात पैसे टाकायला पाहिजे होते. नंतर संचारबंदी करायला पाहिजे होती; परंतु तसे न झाल्याने आमची गैरसोय झाली आहे.
-गंगाबाई हुकरे लाभार्थी पदमपूर.
................
कोरोनामुळे आम्हाला खूपच त्रास होत आहे. कोरोनाच्या भीतीपेक्षा जगण्याची भीती सतावत आहे. निराधार योजनेचे पैसे आल्याचे सांगितले जाते; परंतु पैसे आले किंवा नाही, हेही आम्हाला माहीत नाही.
- मीराबाई राऊत, लाभार्थी.
.............
कोरोनामुळे गरीब, गरजू यांना फटका बसू नये म्हणून सरकारने प्रत्येकाच्या खात्यात एक हजार रुपये टाकत असल्याचे सांगितले; परंतु ही मदत आधी करायला पाहिजे होती, त्यानंतर संचारबंदी करणे अपेक्षित होते. आमच्या हातात पैसे नाही आणि थोपवलेली संचारबंदीत आमची गैरसोय झाली.
- राधिकाबाई वाघाडे, लाभार्थी.