लोकसंस्कृतीच्या घडणीतील महत्त्वाचा घटक म्हणजे नाथजोगी, वासुदेव, गोंधळी, भुत्या, वाघ्या, मुरळी, भराडी, पोतराज इत्यादी बारा लोकसंस्कृतीच्या माध्यमातून हा समाज आपल्या परिचयाचा आहे. मात्र देशभरात विखुरलेला हा नाथजोगी समाज आज अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकला आहे. जिल्ह्यात अशा समाजबांधवांची संख्या सुमारे २-३ हजारांच्या जवळपास आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अख्खे कुटुंब सोबत घेऊन या समाजाची पावले आज इथे तर उद्या तिथे अशीच आजतागायत भटकत आहेत. परिस्थितीनुसार आजही अनेक समाजबांधव पाड्यात, पालावरच्या घरात राहतात. मात्र शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने अनेक सामाजिक समस्यांचा घेरा या समाजाभोवती अधिकच घट्ट झाला आहे. नाथजोगी समाजाच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्वही नसल्याने या समाजाच्या जगण्याशी संबंधित अनेक प्रश्न कायम आहेत. शासनाने त्यांच्या निवासस्थानाची व शिक्षणाची व्यवस्था केल्यास नाथजोगी समाजबांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येऊ शकते. ग्राम अदासी परिसरात नाथजोगी, बैगी भटक्या व आदिवासी समाजाचे लोक राहतात. येथील लोक अशिक्षित असल्यामुळे त्यांच्याजवळ जाती व रहिवासीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अनेक शासकीय कामामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत अदासी येथे आधारकार्ड बनविण्याचे शिबिर लावून अडचण दूर करण्यास शासनाने पुढाकार घेतला आहे.
नाथजोगी समाजबांधवांचे आधारकार्ड नोंदणी शिबिर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:34 AM