महाविद्यालयांचा कारनामा : शिक्षक वाटत आहेत पत्रकंगोंदिया : सध्या महाविद्यालयीन प्रवेशाचा हंगाम सुरू आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. नेमकी हीच संधी साधून येथील काही महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्याना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आकर्षक आॅफर्स दिल्या जात आहेत.दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. अशात शहरातील नामवंत महाविद्यालयातील जागा लगेच भरून जातात. तर नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नरत राहात असल्याने अन्य महाविद्यालये धास्तीत असतात. नेमकी हीच बाब हेरून येथील एका महिला महाविद्यालयाने अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आॅफर दिली आहे. यामध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या ८० टक्केच्या वर गुण असणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत प्रवेश व गणवेश दिला जाणार आहे. तसेच ७० टक्केच्या वर गुण असणाऱ्या कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींनाही मोफत प्रवेश व गणवेश दिला जाणार आहे. याशिवाय महाविद्यालयातील अन्य सुविधांबाबत तसेच मागील व या वर्षाचा निकाल आदी माहिती असलेली पत्रकं सध्या वाटली जात आहेत. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने अनेक महाविद्यालयांकडून आपापल्या परीने विविध ‘स्कीम’ देऊन आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून शिक्षणाचे खरोखरच बाजारीकरण झाल्याचे चित्र उभे होत आहे. महाविद्यालयांची वाढलेली संख्या आणि शिक्षकांची संख्या टिकवून ठेवण्यासासाठी महाविद्यालय प्रशासनाला ही कसरत करावी लागत आहे. एकीकडे आॅफर्स दिल्या जातात तर दुसरीकडे हळूच या ना त्या निमित्ताने डोनेशनसुद्धा उकळण्याचा प्रयत्न काही महाविद्यालये करीत आहेत.फक्त विद्यार्थी मिळावे यासाठी सुरू असलेली शाळा व महाविद्यालयांची धडपड केवीलवानी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)
११वी प्रवेशासाठी दिल्या जाताहेत आॅफर्स
By admin | Published: July 01, 2014 1:32 AM