आॅनलाईन लोकमतगोंदिया : पतीच्या तुटपुंज्या कमाईतून कसेतरी कुटुंब चालत होते. लघुउद्योग करण्यासाठी जवळ पैसा नव्हता. अत्यंत हलाखीच्या जीवनात तिरोडा तालुक्याच्या जमुनिया येथील लता मेश्राम यांनी सहयोगीनींच्या सहकार्याने आरती स्वयंसहायता महिला बचत गट तयार केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाच्या व्यवसायातून त्यांनी कुटुंबाच्या मिळकतीत हातभार लावलाच, शिवाय पतीलाही सुतार कामाचे उद्योग थाटून दिल्याने आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणली.३८ वर्षीय लता मेश्राम यांच्या कुटुंबात १२ वर्षाचा मुलगा, १० वर्षाची मुलगी, पती व त्या स्वत: अशा चार जणांचा परिवार. आठवड्यातून चार ते पाच दिवस पती मजुरीने फर्निचरचे काम करीत. १५० ते २०० रूपये त्यांना रोजी मिळत होती. मात्र काम नसले तर घरीच रहावे लागत होते. अशा परिस्थितीत पतीपत्नी दोघांना काय करावे व काय नाही, कळत नव्हते. लघुउद्योगासाठी पैसा नव्हता. कुणी कर्ज देत नव्हते. कसे तरी संसार चालत होते.दरम्यान गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बचत गटाची स्थापना करण्यात आली. लता यांनी सचिव म्हणून काम सांभाळले. गटाला सहा महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर आयसीआयसीआयकडून ४० हजार रूपयांचे गटाला कर्ज मिळाले. त्यापैकी लता यांनी चार हजार ५०० रूपये कर्ज घेतले व त्या पैशाने एक शेळी विकत घेतली. त्यांनी १२ महिन्यांच्या आत सदर कर्जाची पूर्ण परतफेड केली. परंतु दुर्दैवाने घरी आजारपण आल्याने व पैशाच्या अडचणीमुळे ती शेळी व दोन पिल्लू सहा हजार ५०० रूपयांत विकावे लागले.पुन्हा दुसºयांदा मे २०१६ मध्ये आयसीआयसीआयकडून एक लाख ३२ हजार रूपयांचे कर्ज गटाला मिळाले. त्यातून २५ हजार रूपयांचे कर्ज लता यांनी घेतले. त्यातून तीन शेळा व एक बोकड खरेदी केले. आधी त्या दुसऱ्यांच्या घरी कामाला जात होते. पर आता त्यांनी ते बंद करून स्वत:च्या शेळ्यांना चारायला नेणे व त्यांच्या देखभालीकडे लक्ष देणे सुरू केले. शेळ्यांची वेळोवेळी देखरेख व मार्गदर्शनासाठी पशुसखी येत होत्या. आता त्यांच्याकडे ९ शेळ्या आहेत. अडचणीच्या वेळी त्यातील एक-दोन विकून त्या आपली गरज भागवून घेतात.गावात संजिवनी ग्रामसंस्था असून आता लता त्या संस्थेच्या कोषाध्यक्ष आहेत. ही ग्रामसंस्था म्हणजे महिलांची एक मिनी बॅँकच आहे. या संस्थेला तीन लाखांचा निधी मिळाला. त्यातील ६० हजार रूपयांचा कर्ज आरती बचत गटाने घेतला. त्यातून लता यांनी ३० हजार रूपयांचे कर्ज घेवून आपल्या पतीसाठी छोटेखानी सुतार कामाचा उद्योग सुरू करून दिला. आता त्यांचा कुटुंब आनंदात असून हे सर्व महिला बचत गटाने दिलेल्या आधारामुळे व माविमच्या सहकार्यामुळे घडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.अशी झाली गटाची स्थापनाएप्रिल २०१४ मध्ये लता मेश्राम यांच्या गावात (जमुनिया) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत माविमने बचत गट स्थापनेची मोहीम सुरू केली. तेथील सहयोगीनी त्यांच्या घरी गटस्थापनेसाठी गृहभेटीकरिता आल्या. तेव्हा लता यांनी संकोच न करता आपल्या आर्थिक परिस्थितीची त्यांना माहिती दिली. तेव्हा सहयोगीनीने त्यांना बचत गटाचे महत्व पटवून दिले. यावर लता यांनी मोहल्ल्यातील १२ महिलांना जमा केले. नंतर सहयोगीनीस घरी बोलावून १२ महिलांसह बैठक झाली. बचत गटाची माहिती देवून २ जुलै २०१४ रोजी आरती स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना झाली. सर्वांच्या सहमतीने लता यांना गटाच्या सचिव म्हणून निवडण्यात आले. त्यावेळी त्यांना गटाविषयी काहीही समजत नव्हते. मात्र सहयोगीनींने वारंवार प्रशिक्षण दिल्यामुळे गटाचे व्यवहार व रेकार्ड कसे भरावे, ते समजू लागले.
आरती बचत गटाने दिला लताच्या जीवनाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 8:31 PM
पतीच्या तुटपुंज्या कमाईतून कसेतरी कुटुंब चालत होते. लघुउद्योग करण्यासाठी जवळ पैसा नव्हता.
ठळक मुद्देशेळीपालनातून उन्नती : पतीलाही लावून दिला सुतार उद्योगआम्ही स्वयंसिद्धा-५