सडक अर्जुनी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डुंडा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गेल्या तीन महिन्यांपासून गायब असल्याची लेखी तक्रार खंडविकास अधिकारी यांच्या दरबारात पोहोचली आहे.
ग्रामसेवक हा गावाच्या विकासाचा कणा आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातील नागरिकांना देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अशा वेळी ग्रामसेवकच गायब असेल तर विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील डुंडा येथील ग्रामसेवक संजय शहारे हे २३ मार्च २०२१ पासून ग्रामपंचायतीत न आल्याची लेखी तक्रार सरपंचांनी खंडविकास अधिकारी मार्तंड खुने यांच्याकडे केली आहे.
त्या अनुषंगाने खंडविकास अधिकारी खुने यांनी ग्रामसेवक शहारे यांना २८ मे रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पण, ग्रामसेवक कामावर रुजू झालेले नाहीत. परिणामी, गावातील विकासकामे खोळंबली आहेत. वीज बिल वेळेवर न भरल्यामुळे ग्रामपंचायत, प्राथमिक शाळेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सध्या कोविड १९ ची परिस्थिती लक्षात घेता गावात लोकजागृतीचे विविध उपक्रम राबवावे लागतात. रोजगार हमी योजनेची कामे, पंतप्रधान आवास योजनेचे घरकूल बांधकाम, गुरांचे गोठे बांधकाम, अकुशल कामाचे हजेरी पट सादर करणे, गावात उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामसेवकाअभावी गावकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. खंडविकास अधिकारी मार्तंड खुने यांनी लक्ष देऊन दुसऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी सरपंच देवेंद्र बिसेन, सदस्य भपेंद्र बागडकर, ललिता उईके, शकुंतला मदनकर, रिना येरणे, सेशकला कवरे आदी सदस्यांनी केली आहे.
........
शहारे ग्रामसेवकाची लेखी तक्रार प्राप्त झाल्याने त्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जर त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर दुसऱ्या ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायतीचा कारभार सोपविला जाईल. सुट्टीचे अर्ज न देता कर्तव्यावर हजर नसल्याने योग्य ती कारवाई केली जाईल.
- मार्तंड खुने, खंडविकास अधिकारी
पंचायत समिती.