संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) शीर्षक वाचून दचकलात ना ! हो, पण हे अगदी खरं आहे. पाऊस नाही, की पावसाची रिपरिप नाही. पण त्या झाडाखाली उभे राहिल्यावर शॉवरसारखं पाणी गळतंय. आहे ना आश्चर्य ! तेंदू झाडाखाली गेल्या तीन-चार दिवसांपासून अनुभूती येत आहे. यामागे काय शास्त्रीय कारण दडलं आहे त्याचा शोध सुरू आहे.
अर्जुनी मोरगावच्या वन विभाग आगारासमोर रस्त्याच्या विरूद्ध दिशेला तेंदूची झाडे आहेत. या झाडाखाली ओलं आहे. येथून रस्त्याने ये-जा करतांना काही लोकांना नेमकं याच झाडाखाली पाऊस येत असल्याचा भास दोन-तीन दिवसांपासून होत आहे. पण याकडे कुणीही गांभीर्याने बघितलं नाही. दररोज अनेक लोकं मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्याने जातात. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस नाही, पावसाची रिपरिप नाही. लख्ख ऊन पडलेलं आहे. मात्र, नेमक्या या झाडाखालची जागा पाऊस येऊन गेल्यागत ओली कशी आहे? हा प्रश्न त्यांना पडला. नेमकं झाडाखाली उभं राहिल्यावर शॉवरसारखे पाण्याचे अगदी बारीक तुषार अंगावर पडतात, याची खात्री त्यांना पटली. सोमवारी सकाळी ही बातमी गावात पसरली. अनेकांनी शॉवरचा अनुभव घेतला. काही अभ्यासक ही नवलाई बघण्यासाठी आले. त्यांनीही अनुभव घेतला. कॅमेरे, दुर्बीण लावून निरीक्षण केले. त्यांना काही वेळाच्या अंतरात फांद्यांजवळून पिचकारीतून पाणी फेकल्यागत दिसून आलं. सूक्ष्म निरीक्षणाअंती झाडाच्या खोडावर मधमाशीसारखे कीटक दिसून आले व ते फवारणी केल्यागत पाणी फेकत असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. सोमवारी सायंकाळी ढगाळ वातावरण व पाऊस झाल्याने या किड्यांनी स्थानबदल केला. त्या तेंदू झाडाखाली असलेल्या इतर लहान झाडावर आलेत. ऊन तापल्यानंतर ते परत त्याच झाडावर गेले. ढगाळ वातावरण व पावसाच्या वेळी ते पाणी उत्सर्जित करत नाहीत. याचे सूक्ष्म निरीक्षण प्रा. डॉ आशिष कावळे व प्रा. अजय राऊत यांनी केले. मंगळवारी दुपारनंतर परत पाणी उत्सर्जित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकं ते बघण्यासाठी गर्दी करत आहेत. पुन्हा पाऊस झाल्यास ते स्थानबदल करतात का? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
............
तो कीटक सिकाडा
तो कीटक सिकाडा आहे. त्याचे शास्त्रीय नाव लेमुरीआना अपिकॅलिस असे आहे. उष्ण हवामानाच्या प्रदेशातील हा कीटक आहे. जगात यांच्या तीन हजारांवर प्रजाती आहेत. याचे डोळे मोठ्या आकाराचे असून, रंग पिवळा आहे. आपल्या शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी ते झाडाच्या खोडापासून झायलम सॅप शोषून शरीराच्या मागील भागातून फवारा केल्यासारखे उत्सर्जित करतात.
- प्रा. डॉ. आशिष कावळे, प्रकृती नेचर फाऊंडेशन, अर्जुनी
...........
तापमान कायम राखणे गुणधर्म
हा कीटक सिकाडाच आहे. हा कीटक एकावेळी साधारणपणे ४०० ते ६०० अंडी देतो. जेंव्हा या कीटकाच्या शरीराचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते, तेव्हा शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पाणी शोषणे व फवारा मारून बाहेर काढणे, ही प्रक्रिया नियमित करीत असतात. या प्रक्रियेद्वारे ते आपल्या शरीराचे तापमान ५ अंश सेल्सिअसने कमी करतात. झाडावरून पाणी पडणे, हा अंधश्रद्धेचा भाग नसून त्याला शास्त्रीय कारण आहे.
-प्रा. अजय राऊत, प्रकृती नेचर फाऊंडेशन अर्जुनी.
060721\img-20210705-wa0021.jpg
तेंदू झाडावर असलेले हेच ते सिकाडा कीटक