अर्जुनी मोरगाव : झरपडा ग्रामपंचायतीमध्ये मग्रारोहयोंतर्गत पांदण रस्त्यावर झालेल्या मुरूम कामात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप ट्रॅक्टर मालकांनी केला आहे. नजीकच्या ट्रॅक्टर मालकांच्या नावे मोठी राशी तर, काहींना अत्यल्प राशी अदा करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
झरपडा ग्रामपंचायतीमध्ये २०१६-१७ या कालावधीत मग्रारोहयोंतर्गत चार पांदण रस्त्यावर मुरूम काम करण्यात आले. यात १४ ट्रॅक्टर मालकांनी मुरूम वाहतूक करण्यास समर्थता दर्शवली. या योजनेत मजुरांना काम मिळावे, यासाठी मशीनद्वारे काम करणे बेकायदेशीर ठरविले आहे. मात्र मुरूम खोदकाम हे जेसीबी मशीनद्वारे करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ट्रॅक्टर चालकांनी जेसीबी मालकाला वर्गणी गोळा करून पैसे दिल्याचे सांगितले. मात्र ग्रामपंचायतने नजीकच्या लोकांची हजेरी पत्रकावर हजेरी दर्शवून त्यांचे नावे मजुरी काढल्याचे ट्रॅक्टर चालकांचे म्हणणे आहे. कामावर असलेल्या सर्व ट्रॅक्टर चालकांनी जवळपास समप्रमाणात मुरुमाच्या खेपा घातल्या असतानाही नजीकच्यांना भरघोस तर काहींना अत्यल्प मोबदला देण्यात आला. यात तत्कालीन सरपंचाने आपल्या मुलाचे नाव मोठ्या रकमेचे बिल काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची समितीमार्फत चौकशी करण्यात आली. ही चौकशी कर्मचाऱ्यांच्या बचावाच्या दृष्टीने थातूरमातूर करण्यात आल्याचा आरोप आहे. ही चौकशी संपूर्ण मुद्द्यांवर झाली नाही. केवळ दर तफावत असल्याचे दर्शवत तत्कालीन ग्रामविकास अधिकारी पी. आर. चव्हाण व ग्रामसेवक अरविंद साखरे यांचेवर १९ हजार ५९३ रुपयांची अफरातफर झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. ती दोघांकडून समप्रमाणात वसूल करण्याचे अहवालात नमूद आहे. मात्र यात मोठी अफरातफर झाली असून याची मुद्देनिहाय सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी भोजराज मारोती बोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
...........
गैरप्रकार नाहीच - परशुरामकर
मुरूम कामासाठी १४ ट्रॅक्टर बोलाविण्यात आले. मजुरांद्वारे हजेरीपत्रक काढून मुरूम खोदकाम करण्यात आले. एक आठवड्याचे हजेरीपत्रक काढले. त्यानंतर पावसामुळे काम थांबविण्यात आले. काही कालावधीनंतर परत काम सुरू करण्यात आले. शेतीची कामे सुरू झाल्याने पूर्वी कामावर असलेल्या ट्रॅक्टरपैकी केवळ ४ ट्रॅक्टर मालकांनी उर्वरित काम पूर्ण करण्यास समर्थता दर्शविली. त्यामुळे त्यांच्यामार्फत उर्वरित काम पूर्ण केले, असे लेखी बयाण चौकशी समितीसमोर तत्कालीन सरपंच नामदेव परशुरामकर यांनी दिले.