गोंदिया : संजय गांधी निराधार योजना समिती आमगाव तालुक्याची त्रैमासिक सभा तहसील कार्यालय आमगाव येथे समितीचे अध्यक्ष नटवरलाल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेमध्ये संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ८६, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेंतर्गत १९९, इंदिरा गांधी विधवा पेंशन योजनेंतर्गत ३१, इंदिरा गांधी अपंग अनुदान योजनेंतर्गत २६ आणि श्रावणबाळ वृध्दापकाळ अर्थसहाय्य योजनेंतर्गत १४६ असे एकूण ४८८ लाभार्थ्यांचे अर्ज समितीव्दारे मंजूर करण्यात आले. यात ३४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष नटवरलाल गांधी, सदस्यगण हुकूमचंद बहेकार, राजेंद्र शर्मा, संजय डोये, हंसगीता रहांगडाले तसेच शासकीय प्रतिनिधी समितीचे सचिव तहसीलदार राजीव शक्करवार, नायब तहसीलदार एच.के. रहांगडाले, खंडविकास अधिकारी मून, व्ही.व्ही. रहांगडाले, सी.आर. शहारे, रुपाली नेरल आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या संदर्भात ज्या लाभार्थ्यांना पैसे बरोबर मिळत नसतील, अनेक दिवसांपासून ज्यांचे अर्ज मंजूर झालेले नसतील, ज्यांचे बँकेमध्ये पैसे जमा होत नसतील त्यांनी या संदर्भात समितीला माहिती द्यावी, जेणेकरून लाभार्थ्यांना सहकार्य करता येईल. अनेक लाभार्थ्यांचे अर्ज पूर्ततेअभावी तलाठी कार्यालयातच पडून राहतात. त्याकडेसुध्दा लाभार्थ्यांनी लक्ष पुरवावे आणि प्रकरण तहसील कार्यालयात पाठविण्यास सहकार्य करावे, असे सांगण्यात आले. आभार नायब तहसीलदार एच.के. रहांगडाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेची सांगता
By admin | Published: August 24, 2014 11:35 PM