गोंदिया : जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी स्वत:सह उपविभागीय अधिकाऱ्यांसाठी एकूण १५ हजार रुपयांची लाच मागून रक्कम स्वीकारणाऱ्या शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
बुधवारी (दि. २३) जिल्हा परिषद कार्यालयात ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी उपविभागीय अभियंत्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाखा अभियंता दामोदर जगन्नाथ वाघमारे व उपविभागीय अधिकारी नुरपालसिंह अजाबसिंह जतपेले असे लाचखोरांचे नाव आहे.
शाखा अभियंता वाघमारे याने तक्रारदारास केलेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी स्वत:सह जतपेले यांच्यासाठी एकूण १५ हजार रुपयांची मागणी केली होती. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीच्या आधारे पथकाने बुधवारी (दि. २३) जिल्हा परिषदेत सापळा लावून वाघमारेला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तर जतपेले यांनीही दाेन टक्केप्रमाणे पैशांची मागणी केल्याने दोघांवर शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम सात अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.