गोंदिया : जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून प्रभार सांभाळताना सुनील मांढरे यांनी शिक्षकांना बोगस नियुक्ती दिलेली आहे. या प्रकरणाची एसीबी चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केल्यामुळे शिक्षक संचालक द. गो. जगताप यांनी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना १७ सप्टेंबर रोजी पत्र देऊन सुनील मांढरे यांची एसीबी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेने केलेल्या बोगस भरती प्रकरणात शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण संचालक यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात यावी, या चौकशीत जे आढळेल ते १५ दिवसांत शिक्षण संचालक कार्यालयात त्याचा अहवाल सादर करावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शासनाने भरती बंद ठेवली असतानाही गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षक नियुक्तीस परवानगी दिली होती. त्या वेळी शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कच्छवे हे सुट्टीवर असताना प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून सुनील मांढरे होते. त्यांनी बोगस शिक्षक भरती करून मोठ्या प्रमाणात पैसे लुबाडल्याचा आरोप मांढरे यांच्यावर आहे. या रकमेतून मोठी मालमत्ता त्यांनी बनविल्याचा आरोप आहे. या बोगस भरती प्रकरणामुळे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ माजली असून याची तक्रार मुंबई मंत्रालयापर्यंत गेली. मांढरे हे सेवानिवृत्त झाले असून आता त्यांच्या या कृत्याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाला शिक्षक आमदार नागो गाणार यांनी उचलून धरल्याने आता निष्पक्ष चौकशी होण्याची शक्यता आहे. चौकशी अहवालाच्या आधारावर बोगस शिक्षक प्रकरणात दोषी कोण हे पुढे येईल. परिणामी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.