गोपालदास अग्रवाल : प्रकल्पग्रस्त समितीतर्फे सत्कार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आज प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजला घेऊन सत्ताधारी नेते श्रेय लाटण्यासाठी आता वृत्तपत्र व होर्डिंग्सच्या माध्यमातून अनैतिक प्रचार करीत आहेत. मात्र या पुनर्वसन पॅकेजसाठी विधानसभेत कित्येकदा आवाज उठविला व मंत्रालयाच्या चकरा मारल्या. सुरूवातीपासून करण्यात आलेल्या संघर्षामुळेच पॅकेजच्या मंजुरीचे यश लाभले असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने ३८.४३ कोटींच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, मोठ्या आशेने जनतेने भाजपच्या नेत्यांवर विश्वास दाखविला. मात्र ते नेते आता दिल्लीला निघून गेले व प्रकल्पग्रस्तांची कधी विचारणाही केली नाही. आता मात्र पॅकेजचे श्रेय लुटण्यासाठी ते पुढे येत असून त्यांना जनताच धडा शिकविणार असे मत व्यक्त केले. संघर्ष समितीचे सचिव गोविंदसिंग पडेले यांनी, पॅकेज मिळवून दिल्याबद्दल आमदार अग्रवाल यांचे आभार मानले. विमानतळ निर्माणापासूनच अधिकारी व शेतकऱ्यांत संघर्षाची स्थिती बनली होती व त्यात आमदार अग्रवाल यांनी नेहमी सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांनीच हे पॅकेज मंजूर झाल्याचेही ते म्हणाले. संचालन पंडेले यांनी केले. आभार बिरसी ग्राम कॉंग्रेस अध्यक्ष फागूसिंह मुंडेले यांनी मानले. कार्यक्रमाला रामप्रसाद पंडेले, सावलराम महारवाडे, संघर्ष समिती अध्यक्ष गजेंद्र वंजारी, नत्थू शेंडे, पंचम तावाडे, झाडूसिंह बैस, खातीया सरपंच केशोराव तावाडे, रमेश अंबुले, शेखर पटले, विजय लोणारे, उत्तम चव्हाण, भय्यासिंह कोहरे, हरी हरिणखेडे, संतोष घरसेले, सूरज खोटेले, टिकाराम भाजीपाले, सुरेश पंधरे, कलावती गजभिये, कमला भेंडारकर, शिशूपाल नैकाने, बहादूरसिंह यादव, चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, डुडी तावाडे, मुन्ना मेश्राम, योगराज मेश्राम, घनश्याम बैस यांच्यासह मोठ्या संख्येत बिरसीवासी उपस्थित होते.
सतत संघर्षाने मिळाली पॅकेजला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:57 AM