लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : अज्ञात वाहनाने धडक दिल्यावर एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्याच्या नातेवाइकांना दोन लाख रुपये, तर जखमीला ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. यासाठी संबंधित तपास पोलिस अंमलदार किंवा नातेवाइकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
'हिट अॅण्ड रन' या कायद्यांतर्गत ही मदत केली जाते. मात्र, याची सामान्यांसह पोलिसांना फारशी माहिती नसल्याने लाभ घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने २५ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार एखाद्या व्यक्तीला, वाहनधारकाला जर अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यात संबंधित वाहनधारक किंवा व्यक्ती मरण पावल्यास किंवा जखमी झाल्यास त्याच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे.
या कायद्याची फारशी जनजागृती नसल्याने याचा अद्याप तरी कोणी लाभ घेतलेला नाही. विशेष म्हणजे, नुकसान भरपाई दावा नातेवाईक किंवा संबंधित तपासी अंमलदार, पोलिस अधिकारी, कर्मचारीही करू शकतात. सध्या अपघाताच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी अपघात होताच वाहनचालक पळ काढत असल्याचे चित्र जिल्ह्यात अनेकदा पाहयला मिळते.
कायद्याची जनजागृती करण्याची गरज
- अनेकदा भरधाव वाहने पादचारी किंवा छोट्या वाहनाला धडक देऊन निघून जातात. त्यात संबंधिताचा मृत्यू किंवा जखम होते.
- अशावेळी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला जातो. मात्र, त्या वाहनाचा तपास लागत नाही.
- असे अनेक गुन्हे आजही तपासाविना प्रलंबित आहेत. याच अपघातात मृत, जखमी झालेल्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.
- पैशांत त्याची नुकसानभरपाई होत नसते. मात्र, तरीही भारत सरकारने काही ना काही मदत व्हावी, यासाठी 'हिट अॅण्ड रन' मोटार अपघात योजना २०२२ मधून आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.
- या कायद्याची आणि योजनेची जिल्हाभरात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी महसूल, पोलिस आणि विधी विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
माहितीसाठी यांना येथे विचाराहिट अॅण्ड रन मोटार अपघात योजना २०२२ चा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती जिल्हा वाहतूक शाखा, संबंधित पोलिस ठाणे किंवा आपल्या उपवि- भागीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधू शकतात. त्यांच्याकडे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाची २५ फेब्रुवारी २०२२ रोजीची अधिसूचना आणि अर्जही मागू शकतात.
कोणाकडे करावा दावा
- अपघातात मृत किंवा जखमी झाल्यास ठाण्यातील पोलिस कर्मचारी किंवा मृत, जखमीचे नातेवाईक हे संबंधित उपवि- भागीय अधिकाऱ्यांकडे दावा दाखल करू शकतात.
- संबंधितांना १०० टक्के नुकसान भरपाई देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आदेश शासनाने दिलेले आहेत.