ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा परिषद सभापतींना खाते वाटप व्हायचे असतानाच आरोग्य विभागाच्या पत्रिकेत या सभापतींचा खात्यांसह उल्लेख असल्याने आरोग्य विभागाने खातेवाटपाचे कार्य उरकून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मात्र नवनिर्वाचीत सभापती खुद्द अचंभीत असून जिल्हा परिषदेतील अधिकारीही ही चूक मान्य करीत आहेत.गोंदिया तालुक्यातील लहीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि.१०) पार पडला. या कार्यक्रमाची पत्रिका जि.प.आरोग्य विभागाने छापली. त्या पत्रिकेत लोकप्रतिनिधी आणि जि.प.सभापतींची नावे टाकण्यात आली आहे. यामध्ये जि.प.सभापतीच्या नावाखाली त्यांच्या खात्यांची नावे टाकली आहेत. त्यामुळे सभापतींच्या खाते वाटपाची सभा केव्हा पार पडली आणि त्यांना केव्हा खाते वाटप झाले हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे, ३० जानेवारी रोजी जि.प.च्या विषयी समिती सभापतीपदांची निवडणूक पार पडली. त्यानंतर निवडून आलेल्या सभापतींना सभा घेवून खाते वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभागाने २० फेब्रुवारी रोजी सभा बोलविली आहे. त्यामध्ये सभापतींना खाते वाटप केले जाणार आहे. त्याला सामान्य प्रशासन विभागाने सुद्धा दुजोरा दिला आहे. नियमानुसार विषय समिती सभापतींना सभा बोलावून त्यात अधिकृतपणे खाते वाटप केले जातात. मात्र सभापतींपेक्षा जि.प.आरोग्य विभागालाच सभापतींना खाते वाटप करण्याची घाई झाल्याचे दिसते. त्यामुळे या विभागाने छापलेल्या कार्यक्रम पत्रिकेत सरळ सभापतींची नावे टाकून त्यांच्या नावाखाली खाते सुद्धा टाकले आहे. ही पत्रिका जि.प.पदाधिकाºयांच्या हातात पडताच त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे तेच एकमेकांना सभापतीपदाचे खाते वाटप केव्हा अशी विचारणा करु लागले. मात्र हा सर्व घोळ आरोग्य विभागामुळे झाल्याचे लक्षात आले आहे. खाते वाटपापूर्वीच आरोग्य विभागाने खाते वाटप करुन टाकल्याने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी संबंधितांवर काय कारवाई करतात, की दुर्लक्ष करुन चुकीवर पडदा टाकतात याकडे लक्ष लागले आहे.यासंदर्भात जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा.दयानिधी यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.सभापतीपदाची निवडणूक पार पडली मात्र अद्यापही खाते वाटपाची सभा व्हायची आहे. पत्रिकेत आमच्या नावासमोर खात्याचे नाव कसे टाकण्यात आले, याचे आश्चर्य आहे.- रमेश अंबुले, सभापती जि.प.गोंदिया...................................सभापतीपदाचे खाते वाटप अद्याप झालेले नाही. त्यामुळे पत्रिकेत त्यांची नावे छापताना सभापती क्रमांक १, सभापती क्रमांक २ असे लिहिले जाते. मात्र खाते वाटपापूर्वीच त्यांच्या नावासमोर खाते वाटप झाल्याचे लिहिता येत नाही.- सुधीर वाळके,उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन जि.प.गोंदिया.
खातेवाटपापूर्वीच आरोग्य विभागाने केले खातेवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:23 AM
जिल्हा परिषद सभापतींना खाते वाटप व्हायचे असतानाच आरोग्य विभागाच्या पत्रिकेत या सभापतींचा खात्यांसह उल्लेख असल्याने आरोग्य विभागाने खातेवाटपाचे कार्य उरकून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : लोकार्पणाच्या पत्रिकेत टाकली नावे