गोंदिया : माझ्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप मुलीचे वडील दुर्वास भोयर यांनी केला आहे. या प्रकरणात पोलीस कारवाई करण्यास कुचराई करीत आहेत. आराेपींवर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ते कुटुंबीयासह आत्मदहन करण्यासाठी गुरुवारी येथील प्रशासकीय इमारतीसमोर पोहचले. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील मरारटोली रहिवासी दुर्वास भोयर यांची १४ वर्षीय मुलगी १६ जानेवारीला तिरोडा मार्गावरील भागवतटोलाजवळ जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, १७ जानेवारील सकाळी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये प्रकरण नोंद आहे. माझ्या मुुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या वडील व कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींवर अपहरण करुन खुनाचा गुन्हा दाखल केला नाही. आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी दुर्वास भोयर यांनी केली आहे. मात्र पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सांगत ते गुरुवारी कुटुंबीयांसह आत्मदहन करण्यासाठी गोंदिया येथील प्रशासकीय इमारतीसमोर पोहचले. याची माहिती पोलिसांना होताच त्यांनी भोयर कुटुंबीयांना पोलिसांच्या निगराणीखाली ठेवले. तसेच या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. त्यामुळे काही वेळ या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्याशी संपर्क साधला असता रामनगर पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी भांदविच्या कलम ३६३, २७९, ३०४(अ), ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले.