अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : प्रकृती बरी नसल्याची बतावणी केली. पोलिसांनी उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात नेले. त्याने उलटी आल्याचा बहाणा केला. रुग्णालयाबाहेर नेत असताना सलाईनची नळी तोडून तो जंगलाच्या दिशेने पळून गेला. ही घटना अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. आजूबाजूच्या सर्व पोलिस स्टेशनला सूचना करण्यात आली असून पोलीस यंत्रणा शोध कामाला लागली आहे.
बोंडगावदेवी येथील आरोपी भीमसेन माणिक रामटेके (वय १९) याच्यावर अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात कलम १०३(३) ५ भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल आहे. तो सध्या अर्जुनी मोरगाव पोलिसांच्या लॉकअप मध्ये आहे. बुधवारी सकाळी छातीत दुखत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला भरती करून घेतले. सलाईन लावली. उलटी येत असल्याचा त्याने बहाणा केला. पोलिसांनी सलाईनसह त्याला रुग्णालयाबाहेर नेले. त्याच वेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळून गेला. पोलिसांनी पाठलाग केला. पाठलाग करत असताना एक पोलिस पडला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली. दुसरा पोलीस धावला. मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील आवार भिंतीवरून उडी घेत तो जंगलाच्या दिशेने पळून गेला. संपूर्ण जंगल परिसर पिंजून काढण्याच्या कामात पोलीस गुंतले आहे.