तिघांवर कारवाई : नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पातील प्रकरण सडक अर्जुनी : नवेगावबांध-नागझिरा राखीव क्षेत्रातील वन्यजीव सहवनक्षेत्र कोसबी अंतर्गत वनात अवैध चराई करणाऱ्या ३६ जनावरांना पकडण्यात आले. तसेच तीन इसमांवर सोमवार (दि.१) ला कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, कोसबी सहवनक्षेत्राला लागून असलेल्या बकी गावाजवळ असलेल्या बिट क्रमांक २०२ मधील गवत कुरणात बकीमधील राजकुमार चुटे, विकेश मसराम, मारोती वाढई यांच्या १६ म्हशी, सहा वघार, सहा बैल, ३ गाई, दोन वासरू २, नऊ शेळ्या अशा एकूण ३६ जनावरांना पकडून वन्यजीव विभागाने आपल्या ताब्यात घेतले. गावठी जनावरांची रोगाची लागण वन्य प्राण्यांना होऊ नये व गावठी प्राण्यांना जंगलात जाण्यास मनाई असतानासुद्धा सदर नागरिकांनी व्याघ्र प्रकल्पात नेवून चराई केल्याने वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम २७ (१), ३५ (६), २९, ३५ (७), ३९ (३), ४०, ५१ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार त्या इसमांना जामिनीवर सोडण्यात आले. पकडलेले ३६ जनावरे आजही वन्यजीव विभागाच्या कोसबी कार्यालय परिसरात वन कर्मचारीच्या देखरेखीत ठेवले आहेत. रात्रीच्या वेळी ८ वनमजूर व ३ वनरक्षकांची पाळी लावली जात आहे. या ३६ जनावरांमुळे एक लाख १० हजार रुपयांचे वनांचे नुकसान झाल्याची माहिती वनक्षेत्र सहायक एस.व्ही. भदाने यांनी दिली. या वेळी वनरक्षक पी.एन. जोशी, अमर रंगारी, राजेश सूर्यवंशी, लक्ष्मण चोले, आनंद गबाले, माधव मुसळे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
चराईला गेलेली ३६ जनावरे ताब्यात
By admin | Published: August 04, 2016 12:12 AM