आमगाव : शहरातील विविध भागात सिमेंट रस्ता बांधकाम सुरू असून त्याकरीता मोठ्या प्रमाणात मुरुमाची आवश्यकता असते. त्याकरिता कंपनीद्वारा रॉयल्टी घेऊन मोठ्या प्रमाणात मान्यतेपेक्षा अधिक प्रमाणात मुरुमाचे खोदकाम करून मान्य टिप्परपेक्षा अधिकचे टिप्पर लावून मुरुमाचे खोदकाम करून मुरूम नेत असल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी मुरुम वाहून नेणाऱ्या दोन टिप्परवर कारवाई करण्यात आली.
आमगाव शहरातील रस्ते बांधकामाकरिता शिवालय कंपनी दिल्लीला दिनांक २६ एप्रिल रोजी आदेश काढून मुरूम खोदकाम करण्यासाठी गट क्रमांक ३०४/ १ आर २.१८ मध्ये ५०० ब्रास मुरूम खोदकामची परवानगी देण्यात आली. यासाठी पाच टिप्परला मुरूम वाहन करण्याची परवानगी देण्यात आली. पण प्रत्यक्षात यापेक्षा जास्त टिप्पर लावून मुरुमाची वाहतूक केली जात होती. ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर कारवाही करण्यात आली. या २ टिप्परवर ४ लाख ३९ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश तहसीलदारांनी पारित केले आहे, अशी माहिती तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी बजरंग दलचे प्रांत सहसंयोजक नवीन जैन, जिल्हा सहसंयोजक बालाराम व्यास, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवळी, जनार्धन तडस, राजू बावनथडे यांना दिली.