लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगले-रेंगेपार अंतर्गत जीतलाल अंबुले यांच्या शेतातील सागवान झाडाची विना परवानगीने तोड करण्यात आली. शेतालगत असलेल्या कुरण जंगलातील झाडे अवैधरित्या कापण्यात आली. कापलेली लाकडे घराजवळील रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर ठेवण्यात आली होती. बराच कालावधी लोटूनसुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही. प्रकरण उजेडात येताच वनविभाग जागा झाला व शुक्रवारी (दि. १८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास सुमारे १५ वनकर्मचाऱ्यांनी ती लाकडे कुठल्याही प्रकारचा पंचनामा न करता व हातोडा न मारता, ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र नेत असताना गावकऱ्यांनी पकडले. याप्रकरणी दोषी बीटरक्षकावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सविस्तर असे की, सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगल-रेंगेपार अंतर्गत येणाऱ्या जीतलाल अंबुले (रा. रेंगेपार) यांच्या शेतातील सागवान झाडाची विना परवानगीने कटाई करण्यात आली होती. शेताला लागून उत्तर दिशेला कुरण आहे. त्या जंगलातील सागवान झाडे अवैधरित्या कापून एकत्र ठेवली होती. मात्र, वनविभागाने कोणतीच कार्यवाही केली नाही. अवैध वृक्षतोड प्रकरणात अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. या संदर्भात क्षेत्रसहाय्यक कोसमतोंडी यांनी मला कसलीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले होते. मात्र, प्रकरण अंगलट येणार, या भीतीपोटी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास कसल्याही प्रकारचा पंचनामा न करता व हातोडा न मारता लाकडे ट्रॅक्टरमध्ये भरली. ही माहिती रेंगेपार-पांढरीवासीयांना मिळताच गावकऱ्यांनी ट्रॅक्टर अडविला व वनकर्मचाऱ्यांच्या अवैध प्रकाराला नागरिकांनी उजेडात आणले. प्रकरणाविषयी विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे या प्रकाराला संबंधित वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. त्यातच बीटरक्षकांकडे हातोडा नेहमीच असायला पाहिजे. हातोडा न मारताच व पंचनामा न करताच लाकडे रात्रीच व तीही मध्यरात्री दरम्यानच का उचलण्यात आली. ही लाकडे सहवनक्षेत्रातच की अन्य इतरत्र नेऊन विल्हेवाट लावली जाणार होती असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. एवढेच नव्हे तर, या लाकडांची माहिती संबंधित बीटरक्षकांना असून प्रकरण उजेडात आल्यानंतरच लाकडाची विल्हेवाट लावण्याचे उद्देशाने आखणी करण्यात आल्याची चर्चा नागरिकांत आहे. त्यामुळे यातील दोषी वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.