गोंदिया : दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, त्यांच्या चुकीमुळे कित्येकदा समोरील व्यक्तीचा नाहक जातो. अशा कित्येक घटना घडत असून, त्यांची पोलीस डायरीत नोंद असते. यामुळेच दारूच्या वाहन चालविणाऱ्यांवर अंकुश बसावा म्हणून पोलीस खात्यात ब्रिथ ॲनालायझर देण्यात आले आहे. या मशीनमध्ये संबंधित व्यक्तीला फूक मारायला सांगीतले व त्यावरून त्या व्यक्तीने दारू प्राशन केली आहे की नाही हे कळते. त्यानुसार, पोलिसांकडून कारवाई केली जाते. गोंदियातही ब्रिश ॲनलायझर आले असून, त्यावरून वाहतूक नियंत्रण शाखा कारवाया करते. मात्र कोरोना आल्यापासून प्रत्येकाच्या तोंडावर मास्क आले असून हे अशा दारुड्या वाहनाचालकांसाठी कवच ठरत आहे. त्यातच ब्रिथ ॲनालायझरमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवरील कारवायांची संख्या घटली आहे.
-------------------------
ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता प्रत्येकालाच तोंडावर मास्क लावूनच घराबाहेर पडणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशात हे मास्क आता मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांसाठी कवच बनले आहे. पूर्वी समोरच्या व्यक्तीला बघूनच पोलिसवाले ओलखून घेत व ब्रिथ ॲनालायझरचा वापर करीत होते. मात्र कोरोनामुळे आता संसर्गाची भीती बघता ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद करण्यात आला आहे.
----------------------------
कोट
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांमुळे सर्वाधिक अपघात घडत असून, हा प्रकार त्यांच्या व पुढील व्यक्तीच्या अंगलट येतो. यामुळेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी लागते. विशेष म्हणजे, रात्रीला हे प्रकार जास्त घडत असल्याने पूर्वी रात्रीला कर्मचाऱ्यांना ब्रिथ ॲनालायझर दिले जात होते. मात्र कोरोनामुळे आता मद्यपी वाहनचालकांवरील कारवाया करणे कठीण झाले आहे.
- दिनेश तायडे
निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया
--------------------------------
मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई
महिना २०१९ २०२० २०२१
जानेवारी १ ३ --
फेब्रुवारी १ -- --
मार्च ३ -- --
एप्रिल -- -- --
मे १ -- --
जून ३ -- --
जुलै -- -- --
ऑगस्ट १ -- --
सप्टेंबर ५ -- --
ऑक्टोबर १ -- --
नोव्हेंबर २६ -- --
डिसेंबर २१ -- --