गोंदिया : सद्या देशात कोरोना विषाणूची साथ सुरु असल्याने त्यावर नियंत्रण राहावे म्हणून जिल्हाधिकारी गोंदिया यांनी १९ मार्च रोजी आदेश पारित करून गोंदिया जिल्ह्यातील विविध लॉन, सभागृहे व विवाह समारंभ अशा ठिकाणी कार्यक्रमासाठी ५० लोकांची शासनातर्फे परवानगी देण्यात आली. परंतु या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या फुलचूरच्या आंबाटोली येथील एका लॉनवर २२ मार्च रोजी कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिलेल्या आदेशानुसार २२ मार्च रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक वैशाली पाटीलसह पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी लॉनवर कारवाई केली आहे. आंबाटोली फुलचूर येथे असलेल्या त्या लॉनवर लग्नाच्या स्वागत समाराेहाचा कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमलेली होती. त्यावरुन कार्यक्रमाची परवानगी विचारली असता त्यांच्याकडे त्या कार्यक्रमाकरिता ५० लोकांची परवानगीपत्र असल्याचे सांगितले. परंतु सदर कार्यक्रमस्थळी ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमा होती. परिणामी पोलीस हवालदार बालाजी कोकोडे यांच्या तक्रारीवरुन गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम १८८,२६९, सहकलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.