गोंदिया : नवनीत या नामांकित कंपनीच्या प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स काढून त्यांची विक्री करणाऱ्या झेरॉक्स दुकानदारांवर रामनगर पोलिसांनी कॉपीराईट अधिनियम उल्लंघनप्रकरणी कारवाई केली आहे. शुक्रवारी (दि. १६) रात्री करण्यात आलेल्या कारवायांत पोलिसांनी प्रश्नसंचांचे मायक्रो झेरॉक्स व झेरॉक्स मशीन असा एक लाख ४५ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
शिक्षण क्षेत्रात नवनीत प्रकाशन ही एक नामांकित कंपनी असून, त्यांचे नवनीत २१ अपेक्षित प्रश्नसंच दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरतात. नवनीत एज्युकेशन लिमिटेड कंपनी ही महाराष्ट्र राज्य कॉपीराईट कायदा १९५७ चे कलम ६३ अन्वये प्राधिकृत असून, दुसऱ्या कुणालाही नवनीत २१ अपेक्षित प्रश्नसंच प्रकाशित करण्याचा अधिकार नाही. असे असतानाही शहर आणि रामनगर परिसरातील काही झेरॉक्स दुकानदार या प्रश्नसंचांचे मायक्रो झेरॉक्स काढून त्यांची विक्री करीत असल्याची माहिती कंपनीचे रीजनल सेल्स मॅनेजर तक्रारदार किशोर प्रभाकर सेलुकर (वय ५८, रा. आर्णी रोड, यवतमाळ) यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांना कायदेशीर कारवाई करण्याकरिता रीतसर परवानगी मागून पोलिसांची मदत मिळण्याकरिता विनंती केली होती. यावर पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी व शहर निरीक्षकांना तक्रारदार सेलूकर यांना मदत करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. दरम्यान, शुक्रवारी (दि. १६) तक्रारदार सेलूकर व पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना एन.एम.डी. कॉलेज रोडवरील शिवाणी झेराॅक्सचे मालक रविकांत हरिप्रशाद जायस्वाल (६०), रानी झेराॅक्सचे मालक उज्ज्वल तुषारकांत जायस्वाल (३४) व लक्की झेराॅक्सचे मालक चंद्र रमेश जोशी (३४) हे दुकानात इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाकाळात उपयोगी येणाऱ्या नवनीत २१ अपेक्षित प्रश्नसंचाचे अवैधरीत्या मायक्रो झेरॉक्स प्रती काढून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता नकलीकरण-बनावटी तयार करून विक्री करीत असताना व बाळगताना मिळून आले.
तिघांनी कॉपी राईट ॲक्ट अधिकाराचे उल्लघंन केल्याने त्यांच्यावर कॉपी राईट अधिनियम १९५७ सुधारित अधिनियम १९८४ आणि १९९४ च्या कलम ५१, ६३, ६५ अन्वये रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात पोउपनि चण्णावार, पोलिस अंमलदार स.फौ. अर्जुन कावळे, हवालदार राजू मिश्रा, तुलसीदास लुटे, प्रकाश गायधने, सुजित हलमारे, शिपी कापसे, महिला शिपाई करोशिया यांनी केली आहे.
मिळून आले १०५० मायक्रो प्रश्नसंच- पोलिसांनी केलेल्या या कारवाईत त्यांना शिवाणी झेराक्समधून मायक्रो झेरॉक्स करून ठेवलेले ४५० संच प्रत्येकी ३० प्रमाणे एकूण किंमत १३ हजार ५०० रुपये व मायक्रो झेरॉक्स काढण्याकरिता वापरती एक जुनी झेरॉक्स मशीन किंमत सुमारे ३५ हजार रुपये, रानी झेरॉक्स सेंटरमध्ये ४०० मायक्रो झेरॉक्स संच किंमत १२ हजार रुपये व २५ हजार रुपये किमतीची झेरॉक्स मशीन तसेच लक्की झेरॉक्स सेंटरमध्ये २०० मायक्रो झेरॉक्स संच किंमत सहा हजार रुपये व ७० हजार रुपये किमतीची झेरॉक्स मशीन मिळून आली. पोलिसांनी असा एकूण एक लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.