जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : नवेगावच्या गार्डनचे प्रकरणगोंदिया : नवेगावबांध येथील राष्ट्रीय उद्यान संकुल परिसरातील बहुचर्चित गार्डनचे हस्तांतर अजूनही झालेले नाही. या कामावर दीड कोटींचा खर्च झालेला असताना गार्डनचे लोकार्पण झाले नसल्यामुळे हा विषय काही वर्षांपासून रेंगाळत आहे. याप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल आणि गार्डनचे लोकार्पणही लवकर केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीला दिली.या बगीच्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा संशय असल्याचे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रामदास बोरकर यांनी तक्रार अर्जाद्वारे लोकशाही दिनी गोंदिया येथे केली. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गोंदिया व सन्नी कन्स्ट्रक्शन भंडारा यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याकरीता तक्रार केली होती. या तक्रार अर्जात नवेगावबांध पर्यटन संकुल परिसरात झालेल्या कामाची माहिती, माहिती अधिकारात सहायक जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार नवेगावबांध पर्यटन संकुल परिसरात १.५० लाख रुपये खर्च करून विकास कामे केल्याचे सांगण्यात आले. विविध कामे २००९ मध्ये पूर्ण झाल्याचे दाखवून १ कोटी ५३ लाख २४ हजार ७३७ लक्ष रुपये खर्च झाल्याचे व १३ लाख ९० हजार ४०० रुपये कंत्राटदार व तज्ञ सल्लागाराचे देणे बाकी असल्याचे दाखविले आहे. या पैशातून नवेगावबांध संकुल परिसरात विविध विकास कामे झाली, परंतु ६ वर्षे होऊन सुद्धा एकाही कामाचे लोकार्पण केले नाही. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी लोकशाही दिनी संघर्ष समितीचे अध्यक्ष बोरकर यांनी केली होती. दि.५ आॅक्टोबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिनी बोरकर यांच्यासह भामा चुऱ्हे, अशोक जुगाते हे उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता (रो.ह.यो.), सा.बां.विभाग गोंदिया, उपविभागीय अधिकारी, जि.प.उपविभाग, सा.बां. सडक अर्जुनी, लेखाधिकारी, महसुल विभाग, आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी गोंदिया या समितीकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अहवाल येताच दोषींवर कारवाई
By admin | Published: October 08, 2015 1:26 AM