गोंदिया : सडक-अर्जुनी नगरपंचायत क्षेत्रातील काही भागांतील नागरिकांची नावे नगरपंचायत क्षेत्रासह लगतच्या गावांमध्ये नोंदविली आहेत. अशात या मतदारांनी कोणत्याही एका ठिकाणाहून आपले नाव कमी करण्यासाठी अर्ज करावयाचा आहे. मात्र, त्यानंतरही असा प्रकार आढळून आल्यास अशांवर कारवाई केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २ फेब्रुवारी, २०२१च्या आदेशान्वये गोंदिया जिल्हापरिषद व ८ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याकरिता महाराष्ट्र विधानसभेच्या १५ जानेवारी, २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीचा
वापर करण्यात येणार आहे. मात्र, सडक-अर्जुनी नगरपंचायत क्षेत्रातील भाग क्रमांक १२९, १३०, १३१, १३२ व इतर मतदार यादीमध्ये काही मतदारांची नावे लगतच्या गावामध्ये व नगरपंचायत क्षेत्रातही मतदार म्हणून नोंदविली आहेत किंवा मतदार गट व मतदार गणातील (जि.प.व पं.स.) क्षेत्रात एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदविली आहेत. हा प्रकार उचित नसल्याने अशा दुबार मतदारांनी आपले नाव फक्त एकाच जागी राहील व दुबार नाव कमी करण्याबाबत तत्काळ संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी, तलाठी किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत २ दिवसांत नमुना ७ सादर करणे आवश्यक आहे.
यानंतरही ज्या मतदारांनी मतदार यादीमध्ये दुबार नावे नोंदविली आहेत, असे मतदार मतदान केंद्रावर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध तोतयेगिरी व बोगस मतदान करणारा म्हणून कायदेशीर कार्यवाही व फौजदार खटला दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, तसेच ज्या विवाहित महिलांची नावे त्यांचा मूळ रहिवास व सासरकडील गाव या दोन्ही ठिकाणी समाविष्ट असतील, त्यांनी त्यांचे सद्यस्थितीतील रहिवास ठिकाणचे नाव कायम ठेऊन अन्य ठिकाणी नाव कमी करण्याबाबत अर्ज तत्काळ करायचा आहे, अन्यथा यास दुबार मतदार नोंद म्हणून गृहीत धरून कारवाई केली जाणार असल्याचे सडक-अर्जुनीच्या तहसीलदार उषा चौधरी यांनी कळविले आहे.