तिरोडा : येथे अदानी विद्युत प्रकल्पाची सुरुवात झाल्यापासून तिरोडा शहरात आरोग्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने अनेकदा विनंती केलेली आहे. परंतु आपण तिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे व्यवस्था न करता केटीएस व भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात व्यवस्था केली आहे. तसेच तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी अदानीने तिरोडा येथे ऑक्सिजन प्लँट सुरू करण्याची मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.
तिरोडा येथे प्लँट उभारणीकरिता एमआयडीसीत जागा देण्यात आली. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणीसुध्दा देण्यात आले. सध्या तिरोडा तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच ऑक्सिजन अभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांना गोंदिया, भंडारा येथे उपचारासाठी न्यावे लागत आहे. अदानी प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लँट व कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी बन्सोड यांनी केली आहे. तिरोडा येथे नागरिकांकरिता व कामगारांकरिता लस देण्यासाठी व अपघात झालेल्यांसाठी सुसज्ज रुग्णालय सुरु करण्यात यावे.
तिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे आँक्सिजन प्लँट निर्माण करणे व रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठा करणे, कोविड १९ च्या व्यवस्थेकरिता तिरोडा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करण्याची मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.