अर्जुनी मोरगाव : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हा अजरामर संदेश डॉ. बाबासाहेबांनी मानवजातीला दिला. शिक्षण सर्वांगीण विकासाचे द्वार आहे. आजघडीला प्रत्येक व्यक्ती या मार्गावर प्रवास करीत आहे. शिक्षणातून शासकीय नोकरी हा ग्रामीण भागात प्रत्येकाचा ध्यास असतो. मात्र, हे गणित तेवढे सोपे राहिले नाही. शिक्षण, नोकरी आणि नंतर अर्थार्जन हे सूत्र बदलले पाहिजे. शिक्षणासोबत प्रत्येकाने अर्थ साक्षर होऊन सामाजिक दशा आणि दिशा बदलण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन सहकार अधिकारी प्रशांत गाडे यांनी केले.
तालुकास्तरीय कुणबी समाज संघटना, संत नरहरी सेवा संस्था आणि जय भवानी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्थानिक शिव रेसिडेन्सी येथील सत्कार समारंभात मुख्य सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते. यावेळी देविदास ब्राह्मणकर, देवानंद गजापुरे, हिरालाल घोरमोडे, राधेश्याम भेंडारकर, डॉ. दीपक रहिले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी संघटनांच्यावतीने गाडे यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? प्रशासकीय सेवा हा समाजसेवा करण्याचा सरळ मार्ग आहे. यासाठी एमपीएससी यूपीएससीची तयारी कशी करायची, हे बाळकडू चार वर्षांपासून तालुक्यातील विद्यार्थ्यांना देण्याचे कार्य सहकार अधिकारी प्रशांत गाडे यांनी केले. आज या परिसरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळून शासकीय सेवेत रुजू होऊ लागले आहेत. या बीजारोपणामध्ये गाडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत प्रास्ताविकातून गिरीश बागडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार अश्विन गौतम यांनी केले.