गोंदिया : जिल्ह्यात रबी हंगामातील धान खरेदी सुरू असून, यानंतर आणखी मोठ्या प्रमाणात धान खरेदी अपेक्षित आहे. असे असतानाही धान खरेदीत जागेची कोणताही अडचण येणार नसल्याचे आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक व जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात रबी हंगामामध्ये आदिवासी विकास महामंडळ (भंडारा) प्रादेशिक व्यवस्थापक व जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडून धानाची खरेदी केली जात आहे. मंगळवारपर्यंत (दि.६) आदिवासी विकास महामंडळाने ४०४८५१.६३ क्विंटल तर जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी १७११४८४.०९ क्विंटल धान खरेदी केली आहे. म्हणजेच दोन्ही यंत्रणांनी मिळून सुमारे २८.५५ लाख क्विंटल इतकी धान खरेदी करणे अपेक्षित आहे. असे असताना धानासाठी जागेच्या विषयाला घेऊन बुधवारी (दि.७) जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम.फलके, जिल्हा पणन अधिकारी बी.आर.पाटील, सहायक जिल्हा पणन अधिकारी ए.के. बिसने, प्रादेशिक व्यवस्थापकांचे (भंडारा) प्रतिनिधी जी. एम. सावळे व नवेगाव बांध येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक उपस्थित होते. जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे ४.७५ लाख क्विंटल धान साठवणुकीकरिता जागा उपलब्ध असून दररोज ४०-५० हजार क्विंटल धानाची भरडाई होते. त्यामुळे पुढील १० दिवसांचा अंदाज विचारात घेता सुमारे ४-५ लाख क्विंटल धान साठवणुकीकरिता जागा उपलब्ध होणार आहे, असे आश्वासन प्रादेशिक व्यवस्थापक आणि जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीत दिले आहे.
-----------------------
शाळांच्या इमारती रिकाम्या करा
जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाला २११ शासकीय इमारती तसेच जिल्हा पणन अधिकाऱ्यांना १०८ शासकीय इमारती धान साठवणुकीकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यापैकी बहुसंख्य इमारती या शाळांच्या असल्यामुळे त्यांचा कमीत कमी वापर करून व शाळा सुरू होण्यापूर्वी या इमारती शाळांकरिता रिकाम्या करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी खवले यांनी बैठकीत दिले आहेत.