सालेकसा : तालुक्याच्या ऐतिहासिक वारसा म्हणून लाभलेल्या नैसर्गिक कचारगड या आदिवासी समाजाचे उगमस्थान म्हणून ख्यातीप्राप्त ठिकाणी शनिवारपासून आदिवासी महोत्सव रंगणार आहे. या ठिकाणी २० फेबु्रवारी ते २४ फेबु्रवारी या पाच दिवसाच्या कालावधीत गोंडी संस्कृतीचे दर्शन घडणार असून सांस्कृतिक कार्यक्रम, महासंमेलन दीक्षा समारोह, धार्मिक प्रवचन, कला प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमासह पाच दिवस यात्रा राहणार आहे.मध्यभारतातील सर्वात मोठ्या आयोजनापैकी एक असलेल्या या यात्रेसाठी प्रशासकीय तयारी पूर्णत्वात आली आहे. प्रशासनस्तरावर विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी यात आपला योगदान देत असतात. देशातील अनेक राज्यातून आदिवासी भाविक व इतर पर्यटक या ठिकाणी येतात. पहाडावरुन गुफेत जातात. हा परिसर संवेदनशील असल्याने सतर्कतासुद्धा बाळगावी लागते. या सर्व बाबी लक्षात घेता पोलिस विभागाकडून पुरेशी पोलिस सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. तसेच वृद्ध भाविकांना गुफेपर्यंत सुद्धा पोहोचविण्यासाठी सुद्धा जवान तत्पर राहतील, असे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी सांगितले.येणाऱ्या भाविकांना धनेगाव ते कचारगड गुफेपर्यंत जात असताना ठिकठिकाणी ठंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच तात्पुरते शौचालय, विश्रांतीसाठी परिसरात पेंडॉलची सोय केली जात आहे. तसेच गुफा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावण्यात आले आहेत. त्यामुळे गैरसोय टाळण्यास मदत होईल, असे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कचारगडमध्ये आदिवासी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 2:41 AM