गोंदिया : कोरोनाशी लढा देण्यासाठी आरोग्य विभागाच्या अपुऱ्या मनुष्यबळाला मदत मिळावी म्हणून ३-३ महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर डाॅक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, औषध निर्माता, वाॅर्ड बाॅय, डीईओ असे अनेक पद कंत्राटी म्हणून ऑगस्ट महिन्यात भरण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात १०४ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्यात आली. कोरोनाशी लढा देताना जीवाची पर्वा न करणाऱ्या १०४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने आता घरचा रस्ता दाखविला आहे.
जिल्ह्यात एक आयुष अधिकारी, ६२ स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन ३, लॅब टेक्निशियन १२, औषध निर्माण अधिकारी ८, वाॅर्ड बाॅय ८ व डीईओ १० असे एकूण १०४ जणांची कंत्राटी भरती घेऊन त्यांना २० ऑगस्ट २०२० रोजी तीन महिन्यांचा पहिला कंत्राट देण्यात आला. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी त्यांना पुन्हा तीन महिन्यांचा दुसऱ्यांदा कंत्राट देण्यात आला. त्यांना हा दुसरा कंत्राट २१ जानेवारी २०२१ पर्यंतचा होता. शासनाने २५ टक्यापेक्षा कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करा, असे पत्र सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.
कोविड सेंटरमध्यील १०४ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात
गोंदिया जिल्ह्यात ११ कोविड सेंटरमधील रुग्णांची काळजी घेण्यासाठी कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या १०४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत चालणाऱ्या कोविडच्या विविध कामांसाठी नियुक्ती देण्यात आली होती.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
कायमस्वरुपी नोकरी द्या, संकट काळात काम करणाऱ्यांची गय करा, कोरोना संपल्यावर आमची नोकरी कायम ठेवावी, दर तीन महिन्यांचे देण्यात येणारे आदेश वर्षभराचे करावे, अधिक धोक्याचे काम असल्याने मानधनात वाढ करण्यात यावी.
काम झाले की काढून टाकले
शासनाने आम्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासाठी शासनानेच पाऊल उचलावे. आमची स्वतंत्र संघटना नाही, त्यामुळे आमची मागणी फक्त आमच्याच पुरती मर्यादित आहे. कंत्राटी कामावर आणखी किती दिवस राहणार, नोकरीत कायम करावे.
- नेहा निनावे, कंत्राटी कर्मचारी
कोरोनाशी लढा देत आता कोरोनावर मात करीत असताना शासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडू नये. कोरोनाच्या संकट काळात आम्ही काम केल्यामुळे आम्हाला कायम करण्यात यावे, जेणेकरून आम्हाला जनतेची सेवा करता येईल.
-मोनिका उईके, कंत्राटी कर्मचारी