जि.प. कन्या शाळा : आर्थिक हितापोटी शिक्षण सभापतींचा गैरप्रकार गोंदिया : जिल्हा परिषद कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत कोसळण्यामागे शिक्षण विभाग (प्राथ.) व जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जबाबदार आहेत, असा आरोपी जि.प. सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जीर्ण शाळा दुरूस्तीसाठी नऊ लाखांचा निधी मंजूर करून काम सुरू करण्याची प्रशासकीय मंजुरी डिसेंबर २०१५ मध्येच मिळाली होती. मात्र शिक्षण सभापतींनी ते पत्र दडवून ठेवले. वेळेवर ई-निविदा काढण्यात आली असती तर सदर इमारत क्षतिग्रस्त झालीच नसती, असा आरोप केला जात आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या जि.प. कन्या शाळेची इमारत ५ आॅगस्टच्या रात्री कोसळली. घटना दिवसा घडली असती तर जीवित हानीचा धोका होता. यावरून जि.प. शिक्षण विभाग व त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जि.प. पदाधिकाऱ्यांना विद्यार्थी व पालकांची किती काळजी आहे, हे स्पष्ट होते. सदर शालेय इमारतीला जि.प. सदस्य मनोज डोंगरे, पं.स. सभापती उषा किंदरले, खंडविकास अधिकारी हिरामन मानकर, गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे, अभियंता पी.एम. दमाहे, पी.व्ही. टेंभुर्णीकर, मुख्याध्यापक एन.एस. रहांगडाले, शिक्षण विस्तार अधिकारी पिंटू समरीत व पी.ए. खोब्रागडे यांनी गुरूवार (दि.१०) भेट देवून निरीक्षण केले. यावेळी किंदरले व मनोज डोंगरे यांनी इमारतीच्या दुर्घटनेसाठी जि.प. शिक्षण विभाग व शिक्षण सभापतीला जबाबदार धरले. सदर प्रकरणाची समितीद्वारे चौकशी करून कारवाई करावी व क्षतिग्रस्त इमारतीची संपूर्ण रक्कम शिक्षण विभाग व शिक्षण सभापती यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी केली. डोंगरे यांनी सांगितले की, शिक्षण समिती सभा, जि.प. गोंदिया ठराव क्र.९ दिनांक १९ आॅक्टोबर २०१५ नुसार, सदर इमारतीच्या दुरूस्तीसाठी ९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाला (जा.क्र./ जिपगो/ सशिअ/ बांध/५७१/२०१५) कार्यालय सर्व शिक्षा अभियान, जि.प. गोंदिया दि.२६ नोव्हेंबर २०१५ ने ३१ जानेवारी २०१३ चे परिशिष्ट २ भाग १(१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मंजूर झालेल्या कामाला शिक्षणाधिकारी (प्राथ) उल्हास नरड यांनी मान्यता प्रदान केल्याचे पत्र दिले होते. कामाला प्रशासकीय मंजुरी दिल्याचे पत्र काढल्यानंतर नियमानुसार ई-निविदा काढणे गरजेचे होते. परंतु शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या माध्यमाने सदर पत्र दडवून ठेवले. त्यामुळे ई-निविदा निघू शकली नाही व आठ महिन्यापूर्वीचे मंजूर काम रखडले. शेवटी इमारत कोसळली व शासनावर लाखो रूपयांचा भुर्दंड बसला. (प्रतिनिधी) तीन खोल्यांचे बांधकाम तातडीने करणार सदर शाळेचे छत कोसळल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रकाशित होताच आ.विजय रहांगडाले यांनी या शाळेला भेट देऊन पाहणी केली. या शाळेचे बांधकाम करण्यासाठी आपण यापूर्वीच पाठपुरावा केला होता, परंतू काही तांत्रिक अडचणींमुळे ते काम प्रलंबित राहीले. मात्र ती अडचण दूर करून तीन वर्गखोल्यांचे बांधकाम तातडीने करण्याचे निर्देश दिले असल्याचे आ.रहांगडाले यांनी कळविले. यासोबत इतर सुविधांसाठीही शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या जीवनाशी खेळ कशासाठी? जि.प. कन्या शाळा तिरोडा ही जि.प. कवलेवाडा क्षेत्रांतर्गत येते. यात सात ते आठ गावांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. ११ मार्च २०१६ रोजी शालेय शिक्षण समिती गठित करण्यात आली होती. समितीच्या अध्यक्षपदी जि.प. सदस्य मनोज डोंगरे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली १२ एप्रिल २१६ रोजी सभा झाली. त्यात विषय क्र.२ मध्ये शाळा इमारत दुरूस्तीबाबत ठरावही घेण्यात आले होते. शाळेत पाच ते १२ वर्ग असून ११ तुकड्या आहेत. मात्र तीन वर्गखोल्या सर्वसाधारण असून उर्वरित संपूर्ण इमारत तात्काळ दुरूस्त करण्यात यावे, असे ठरले होते. शिक्षण विभाग व सभापती पी.जी. कटरे यांनी नऊ लाखांच्या निधीच्या कामासाठी तात्काळ ई-टेंडरिंग करून मे-जून महिन्यात दुरूस्तीचे काम केले असते तर इमारत कोसळली नसती. हा आर्थिक लाभाच्या लालसेपोटी लहान मुलांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न आहे. तीन ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्याची तात्पुरती सोय इमारतीची पाहणी करताना जि.प. सदस्य डोंगरे व पं.स. सभापती किंदरले यांनी विद्यार्थ्यांना बसण्याची सोय वेगळ्या ठिकाणी करण्याचे निर्णय घेवून तसे आदेश दिले. त्यानुसार पहिली ते पाचवीचे विद्यार्थी उत्तर बुनियादी शाळा तिरोडा, सातवीपर्यंतच्या वर्गांची व्यवस्था सकाळ पाळीत व आठवी ते दहावीच्या वर्गांची सोय दुपार पाळीत त्याच शाळेत आणि ११ वी व १२ वीचे वर्ग नगर परिषद शाळा तिरोडा येथे बसविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासकीय मंजुरीचे पत्र दडविले
By admin | Published: August 13, 2016 12:24 AM