लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आलेला बिबट वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने तब्बल ९ तासानंतर पिंजऱ्यात अडकला. ही घटना बुधवारी अर्जुनी मोरगावातील बरडटोली येथे घडली. बिबट पिंजऱ्यात अडकल्यानंतर घाबरलेल्या येथील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.मागील दोन दिवसांपासून बरडटोली परिसरात बिबट्याचा धुमाकुळ सुरु होता. तो बरडटोली, सिंगलटोली परिसरात कोंबड्यावर ताव मारायचा. बुधवारी पहाटे ५ वाजता दरम्यान बरडटोली येथील दिलीप मेंढे यांच्या घराशेजारी या बिबट्याला लोकांनी बघितले. बिबट्याला बघताच अनेकांना घाम फुटला. लोक कुतूहलाने बिबट्याला पाहण्यासाठी गोळा झाले. तेव्हा तो प्रकाश चव्हाण यांच्या घराची आवारभिंत व मनोहर वलथरे यांच्या घरी ठेवलेल्या काड्यांमध्ये दबा धरुन बसला. याची माहिती वन कर्मचाऱ्यांना देण्यात आली. लगेच परिवेक्षाधिन वन अधिकारी पूनम पाटे, वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. रहांगडाले यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याला जेरबंद करण्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. वन कर्मचारी व बचाव पथकाने त्याला पिंजऱ्यात अडकविण्यासाठी व्यूहरचना आखली. मनोहर वलथरे यांचे घराजवळ दोराचे जाळे व पिंजरा ठेवण्यात आला. मात्र त्या बिबट्याने चालाखीने उडी मारून पलायन केले. काही काळ वन कर्मचारी हताश झाले.बघ्यांचीही निराशा झाली. पलायन केलेला तो बिबट पुन्हा मन्साराम कांबळे यांच्या घरात शिरला. वन कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा त्यांच्या घराकडे कळविला. ज्यावेळी बिबट कांबळे यांच्या घरात शिरला. त्यावेळी कुटुंबातील सदस्य घरातच होते. माजघराचा दरवाजा बंद करुन त्यांना वनकर्मचाऱ्यांनी घराबाहेर काढले. त्यानंतर त्यांचे घरासमोरील दरवाज्यात पिंजरा अडकविला.तो बिबट सोफ्याच्या खाली दबा धरुन बसला होता. वनकर्मचारी कांबळे यंच्या घरावर चढले. काही कवेलू बाजूला करुन त्याला पिंजऱ्यांत अडकविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र घाबरलेला तो बिबट पुढे जात नव्हता. वनकर्मचाऱ्यांनी फटाक्यांचा अवाज व बिबट असलेल्या खोलीत धूर केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी त्याला गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले. तो बिबट बेशुद्ध झाला. अखेर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.यांनी केली मोहीम फत्तेगोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन वन अधिकारी पुनम पाटे, सहाय्यक उपवनसंरक्षक एन.एस.शेंडे, वन्यजीव विभागाचे क्षेत्रीय अधिकारी मनिषा अतरक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एम. खोडस्कर, राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.एम. खोडस्कर, राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प संरक्षण दल, अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, संजय मेंढे गोठणगाव, खान नवेगावबांध, वन्यजीव विभागाचे धांडे, गस्ती पथकाचे सूर्यवंशी तसेच अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध व गोठणगाव वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.नवेगावबांध व्याघ्र परिसरात सोडलेवनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही मोहिम फत्ते करण्यासाठी तब्बल ९ तास परिश्रम घ्यावे लागले. त्याला पिंजऱ्यात अडकविल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर या बिबट्याला वनकर्मचाऱ्यांनी नवेगावबांध येथे नेले. तिथे त्या बिबट्यावर उपचार केले जाणार आहेत. उपचारानंतर त्या बिबट्याला नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पातील खोबा बिटच्या कक्ष क्र. १ मधील काचेचुवा परिसरात सोडण्यात आले.
९ तासानंतर ‘तो’ बिबट पिंजऱ्यात अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 9:43 PM
कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आलेला बिबट वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने तब्बल ९ तासानंतर पिंजऱ्यात अडकला. ही घटना बुधवारी अर्जुनी मोरगावातील बरडटोली येथे घडली. बिबट पिंजऱ्यात अडकल्यानंतर घाबरलेल्या येथील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ठळक मुद्देलागली होती कोंबड्यांची चटक : बरडटोलीवासीय दहशतीत, पाहण्यासाठी गावकऱ्यांची एकच गर्दी