एक निलंबित : दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखलअर्जुनी-मोरगाव : खांबावर विद्युत दुरूस्तीचे काम सुरू असताना विजेचा धक्का बसल्याने भाजलेल्या कंत्राटी लाईनमनचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या ६ दिवसांपासून त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. सोमवारला सकाळी ९ वाजता त्याची नागपूर येथे प्राणज्योत मालवली. सोमवारी स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी दोन वीज कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, मोरगाव येथे विद्युत लाईनचे काम सुरू असताना ईश्वर चंद्रभान निंबार्ते या कंत्राटी लाईनमनला १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वाजता विजेचा धक्का बसला होता. तो विद्युत खांबावर चढून काम सुरू असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाला. ईश्वर सुमारे एक तासापर्यंत विद्युत तारांवर अडकलेला होता. म.रा. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची सूचना देवूनही ते मदतीला धावून आले नाही. अखेर गावकऱ्यांनी त्याला खाली उतरवून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथे नेण्यात आले. तब्बल सहा दिवसपर्यंत त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. या प्रकरणी रमेश सीताराम झोडे (४८) मोरगाव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी महागाव फिडरचे कनिष्ठ अभियंता अतुल भय्याजी मोतनकर (३२) व लाईनमन तुकाराम कृष्णा भक्ते (४०) अर्जुनी मोरगाव यांचेवर ३०४ (अ) भादंविचा गुन्हा नोंद केला. आरोपींनी विद्युत दुरुस्ती सुरू असल्याची खात्री न करता हयगय व लापरवाहीने वीज पुरवठा सुरू केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. दरम्यान, देवरीच्या कार्यकारी अभियंत्यांनी १८ एप्रिल रोजी लाईनमन भक्ते यांचेवर निलंबनाची कारवाई केली. वीज प्रवाह कुणाच्या आदेशाने सुरू करण्यात आला होता याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. विद्युत निरीक्षक याप्रकरणी तपास करीत आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी काही कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. विजेचा धक्का लागल्यानंतर सुमारे एक तासपर्यंत विद्युत तारांवर लोंबकळत असताना सबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांनी कुठलेच सहकार्य केले नाही. आणखी कुणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
अखेर ‘तो’ लाईनमन दगावला
By admin | Published: April 21, 2015 12:38 AM