गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाला शनिवारपासून (दि.६) सुरुवात झाली. वर्षभरानंतर या उड्डाणपुलाच्या कामाचा प्रशासनाला मुहूर्त मिळाल्याने शहरवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर वर्षभरात या पुलाचे बांधकाम पुर्ण केले जाणार असून शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपुल जीर्ण झाल्याने हा पूल वर्षांपुर्वी पाडण्यात आला होता. पण नवीन पुलाचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून सुरु झाले नव्हते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या समस्येत वाढ झाली होती. रेलटोली परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी पुलाअभावी मोठी अडचण झाली होती. तर अंडरग्राऊंड मार्गे वाहतूक सुरु असल्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघातात वाढ झाली होती. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली जात होती. याचीच दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्य शासन आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारी या उड्डाण पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. पुलाचे बांधकाम सुरु करताना आ. विनोद अग्रवाल, माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते.
वाहतुकीची कोंडी सुटणार
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जूना उड्डाणपूल पाडण्यात आला. तर नवीन उड्डाणपुलावर पादचारी मार्ग नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता. त्यामुळे पुलाच्या पलिकडे राहत असलेल्या नागरिकांना शहरात येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. तर जुन्या उड्डाणपुलाअभावी वाहतुकीची कोंडी होत होती. मात्र आता पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाणपुलाचे काम लवकारत लवकर सुरु व्हावे व शहरवासीयांची अडचण दूर व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचेच फलित पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. -प्रफुल्ल पटेल, खासदार
जुना पूल पाडल्यानंतर नवीन उड्डाणपुलाचे काम लवकर सुरु करुन शहरवासीयांची अडचण दूर व्हावी, वाहतुकीची कोंडी साेडवावी यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.- विनोद अग्रवाल, आमदार
उड्डाणपुलाच्या बांधकामाला शनिवारपासून सुरुवात झाल्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.- राजेंद्र जैन, माजी आमदार
गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाणपुलाचे कामाला लवकर सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते. आता बांधकाम सुरु झाल्याने शहवासीयांची मोठी अडचण दूर झाली आहे. - गाेपालदास अग्रवाल, माजी आमदार