अर्जुनी मोरगाव : धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी बाराभाटी ( कुंभीटोला) येथील शेतकऱ्यांनी नवेगावबांध आदिवासी महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन अखेर लेखी आश्वासनानंतर संपुष्टात आले. आता धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार याची परिसरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
रब्बी हंगामातील धान पीक निघाले .मात्र शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे जाऊन मातीमोल भावात धान विकावे लागत आहेत. शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी ११ मे रोजी प्रशासनाला पत्र देऊन दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. अखेर शेतकरी गुरुवारी धान घेऊन उपप्रादेशिक कार्यालयावर जाऊन धडकले. त्यांनी कार्यालयाच्या प्रांगणात धान टाकले व ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. रात्री साडेदहाच्या सुमारास अधिकारी व शेतकऱ्यांत चर्चा झाली. शेतकऱ्यांनी सुचविलेल्या गोदामाचा प्रस्ताव संस्थेकडून प्राप्त झाल्यानंतर गोदामाची पाहणी करून अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल. त्यांची मंजुरी प्राप्त होताच धान खरेदी सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्रीच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. आता शेतकऱ्यांना धान खरेदी केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा आहे.