गोंदिया : नगर परिषदेतीलच दोन कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १०) आंतरिक लेखा परीक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, त्या दोघांचे निलंबन केल्यानंतरच कामकाज केले जाईल, असा पवित्रा नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेत शुक्रवारी (दि. १२) मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावर मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी दोघांचे निलंबन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नगर परिषदेचे कामकाज सुरू करण्यात आले.
नगर परिषदेच्या कामानिमित्त नागपूर येथे गेलेल्या प्रवासाचे बिल काढण्यावरून नगर परिषदेतील बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा व कंत्राटी कर्मचारी अजय मिश्रा यांनी आंतरिक लेखा परीक्षक अतुल बद्धलवार यांना मारहाण केली होती. बुधवारी (दि. १०) सायंकाळी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बद्धलवार यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अशात गुरुवारी महाशिवरात्रीची सुटी असल्याने नगर परिषद कार्यालय बंद होते. मात्र, शुक्रवारी (दि. १२) नगर परिषद अधिकारी व कर्मचारी कार्यालयात आले. त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करा तेव्हाच कामकाज सुरू केले जाईल, असे निवेदन मुख्याधिकारी चव्हाण यांना दिले.
यावर मुख्याधिकारी चव्हाण यांनी दोघांचे निलंबन करण्याचे आश्वासन देत शनिवारी व रविवारी पुन्हा सुटी असल्याने नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून कामकाज सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. यावर त्यांनीही नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर नगर परिषदेचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. यामुळे आता या दोन्ही कर्मचाऱ्यांचे निलंबन कधी केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------
नगर परिषद अभियंत्यांचे प्रकरण ताजेच
आंतरिक लेखा परीक्षकांचे हे प्रकरण घडले असतानाच काही दिवसांपूर्वीच माजी सभापतींच्या पतीने नगर परिषद अभियंत्यांच्या दालनातच त्यांच्यासोबत वाद घालून खुर्च्यांची फेकाफेक केली होती. तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात आता हे प्रकरण घडल्याने नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी खवळले आहेत.