मुख्याधिकाऱ्यांनी घेतली भेट : जनसमस्यांकडे दुर्लक्षामुळे निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा गोंदिया : शहरातील लक्ष्मीनगर (गौतम बद्ध वॉर्ड) येथील नागरिकांनी वॉर्डातील समस्यांसाठी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या नागरिकांनी नगर परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकत आंदोलनाचा मार्ग पत्करल्याने शेवटी मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन बुधवारी (दि.१७) मागे घेण्यात आले. शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चालायले धड रस्ते नसल्यावरच येथील समस्या संपल्या नसून स्वच्छता व पथदिव्यांच्या अभावात येथील नागरिकांना रहावे लागत आहे. विशेष म्हणजे येथील नागरिक आपल्या समस्यांना घेऊन नगरसेवकांकडे तक्र ार करीत असल्यास नगरसेवकांकडून एकमेकांना बोट दाखवित जबाबदारी ढकलण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे पुढे कुणाला हात जोडायचे नाही असा निर्धार धरून व नगर परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकत येथील गंगाधर चंद्रीकापुरे, सतीष बंसोड, एस.डी.महाजन, रवी डोंगरे, दीपक वासनीक, कमलेश उके, प्रशांत मेश्राम, राजू राहूलकर, विनोद मेश्राम, सुरेंद्र खोब्रागडे, राधेश्याम सावस्कर आदींनी मंगळवारपासून (दि.१६) नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेत एक महिन्यात मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावरून बुधवारी (दि.१७) हे आंदोलन मागे घेण्यात आले. (शहर प्रतिनिधी) अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन भीमनगर चौकीपासून अरूण बंसोड यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम नाली बांधकाम, पथदिव्यांची सोय, स्वच्छता आदी मागण्यांना घेऊन लक्ष्मीनगरवासीयांनी नागरिक कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू केले होते. मुख्याधिकारी पाटील यांच्या आश्वासनानंतर हे वादळ शमले. मात्र एक महिन्याच्या कालावधीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करणार असल्याचे आंदोलनकर्ते गंगाधर चंद्रीकापुरे यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर लक्ष्मीनगरवासीयांचे आंदोलन मागे
By admin | Published: August 19, 2016 1:27 AM