लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : संर्पदंशामुळे भावाचा आधार हरवल्याने माेहारे कुटुंबातील दोन बहिणींवर दिव्यांग वडिलांची जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली. त्यातच अठाराविश्वे द्रारिद्र्यामुळे मोहारे कुटुंबीय संकटात आले होते. मात्र, लोकमतने मोहारे कुटुंबीयांच्या संकटाला वाचा फोडल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आणि हिरमुसलेल्या चेहऱ्यांवर अखेर हास्य परतले. जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी (दि.१९) मुंडीपार येथील सर्पदंशाने मायलेकाचा मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली. त्यांच्या भेटीनंतर सात दिवसांत आज पहिल्यांदाच पीडित दोन्ही बहिणींसह दिव्यांग वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित बघून गावकऱ्यांसह प्रत्येक हितचिंतकास आनंद झाला. १३ जून रोजी रात्री दोन वाजता मोहारे कुटुंबातील प्रमुख सतवंती मोहारे (३८) आणि त्यांच्या ११ वर्षीय मुलगा दीपक यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. कुटुंबात आता दाेन शाळकरी मुली आणि त्यांचे दिव्यांग वडील असाहाय्य झाले. पुढील जीवनाच्या वाटेवर फक्त अंधार दिसत असताना त्या पीडित कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी येत असत; परंतु आज (दि.१९) जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट तसेच सालेकसा तहसीलदार शरद कांबळे यांच्यासह जिल्हा आणि तालुका प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचारी आले आणि त्यांनी दहा हजार रुपयांची रोख रक्कम भेट केली. सोबतच विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू यात खाद्यपदार्थ, कपडे इत्यादींचा समावेश होता.
जिल्हाधिकाऱ्यांचे मोहारे कुटुंबीयांसह हितगुज- जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी मोहारे कुटुंबाशी संवाद साधत त्यांना धीर दिला. भविष्यात केव्हाही कोणतीही अडचण आल्यास तत्परतेने मदत मिळेल, असे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या हितगुजानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मुलींना भविष्यात कुठल्या क्षेत्रात जाणार, असे विचारले असता मोठ्या मुलीने संरक्षण क्षेत्रात तर लहान मुलीने वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली. यावर त्यांनी त्यांचे मनोबल वाढवत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.
अन् सुरू झाला मदतीचा ओघ- मोहारे कुटुंबातील दोन्ही मायलेकांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची बातमी आणि त्यानंतर पीडित कुटुंबावर संकटाचे आभाळ कोसळल्याचे सविस्तर वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. त्यामुळे मोहारे कुटुंबाला विविध संघटना, प्रशासन आणि समाजसेवी लोकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. प्रत्येकाने मदत करताना लोकमत प्रतिनिधीचे आभार मानले. जिल्हाधिकाऱ्यांनीही लोकमतच्या पुढाकाराची भरभरून प्रशंसा केली. यावेळी अधीक्षक प्रवीण जमदाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र चौबे उपस्थित होते.
प्रशासनाने जर एकत्र येऊन काम केले तर कोणतीही गरजू व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही. आपण एक पाऊल पुढे टाकून सहज नागरिकांचे दु:ख दूर करू शकतो. - राजेश खवले, जिल्हाधिकारी, गोंदिया